९३,६४८ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

By Admin | Published: June 13, 2017 01:03 AM2017-06-13T01:03:17+5:302017-06-13T01:03:17+5:30

शासनाने अल्पभूधारक व मध्यम शेती असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर संपूर्ण कर्जमाफी तत्त्वत: मान्य केली.

9 3,648 farmers to get relief from debt waiver | ९३,६४८ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

९३,६४८ शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

googlenewsNext

थकबाकी २,८८३.२३ कोटींवर : १ लाख १९ हजार शेतकऱ्यांना मिळाला होता व्याजमाफीचा लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाने अल्पभूधारक व मध्यम शेती असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर संपूर्ण कर्जमाफी तत्त्वत: मान्य केली. या माफीचा विचार केल्यास मार्च २०१७ पर्यंत कर्जाची उचल करणाऱ्या जिल्ह्यातील ९३ हजार ६४८ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होण्याचे संकेत आहेत. या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता जिल्ह्याला २ हजार ८८३.२३ कोटी रुपयांची गरज वर्तविण्यात येत आहे. यातील कितींना लाभ मिळतो हे अंतिम निकषानंतरच कळणार आहे.
या कर्जाव्यतिरिक्त मियादी कर्ज आणि शेतीसाहित्य खरेदीकरिता घेतलेल्या कर्जासह कर्जाचे पुनर्गठण करणाऱ्या ६४ हजार ९१६ शेतकऱ्यांवर ३ हजार १७.६४ कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. या कर्जमाफीत त्यांचेही कर्ज माफ होईल अशी चर्चा जोर धरत आहे. या दोन्ही वर्गातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाल्यास जिल्ह्याला ५ हजार ९००.९७ कोटी रुपयांची गरज आहे. सध्या शासनाने अल्पभूधारक आणि मध्यम शेती असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. तर संपूर्ण कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिली आहे.
शासनाच्यावतीने यापूर्वी सन २००८ मध्ये कर्जमाफी केली होती. त्यानंतर आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जावरील व्याज माफ करण्यात आले होते. सोबतच शेतकऱ्यांनी कर्ज भरावे म्हणून संपूर्ण कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २० हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णयही झाला होता. या निर्णयानुसार जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला. मात्र निसर्गाची अवकृपा आणि झालेली नापिकी यामुळे शेतकऱ्यांवरील कर्ज वाढतच गेल्याचे दिसून आले आहे. या कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नसल्याने शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली.
याच मागणीवरून शेतकऱ्यांनी संप पुकारला. या संपातून शेतकऱ्यांचा संताप व्यक्त झाला. शेतकऱ्यांच्या या संपापुढे शासनाने माघार घेत कर्जमाफी जाहीर केली आहे. या कर्जमाफीत जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना अधिक होणार असल्याचे दिसून आले आहे. यात वर्धा जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांची संख्या बरीच असल्याचे दिसून आले आहे. शासनाने या शेतकऱ्यांना कर्ज देत शेतीच्या कामात अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे बँकांत शेतकऱ्यांची चांगलीच गर्दी होत आहे. आतापर्यंत कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या माफीचा लाभ मिळणार असल्याचे संकेत आहेत. यामुळे त्यांच्याकडून नव्याने कर्जाची उचल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सन २००८ मध्ये मिळाला होता ८४ हजार ९०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
शासनाच्यावतीने यापूर्वी सन २००८ मध्ये कर्जमाफी जाहीर केली होती. याचा लाभ वर्धा जिल्ह्यातील एकूण ८४ हजार ९०३ शेतकऱ्यांना मिळाला होता. या शेतकऱ्यांवर १०२ कोटी ७ लाख ८४ हजार रुपयांचे कर्ज होते. या कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे ७४ कोटी ६९ लाख ८२ हजार रुपयांचे कर्ज माफ झाले होेते.

१६ हजार ५५२ शेतकऱ्यांनी घेतला २० हजारांच्या माफीचा लाभ
आत्महत्याग्रस्त जिल्हा असलेल्या वर्धेकरिता शासनाकडून शेतकऱ्यांकरिता संपूर्ण कर्ज भरल्यास २० हजार रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील १६ हजार ५५२ शेतकऱ्यांनी घेतला. त्यांना ३५ कोटी ६६ लाख ९ हजार रुपयांची मदत मिळाली. यावेळी जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सरसकट कर्जाचा भरणा केला होता.

व्याजापोटी झाले होते १२०.३१ कोटी माफ
शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याने शासनाच्यावतीने पीक कर्जावरील व्याज माफ करण्यात आले होते. याचा लाभ जिल्ह्यातील १ लाख १९ हजार ३०९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. या शेतकऱ्यांवर २७९ कोटी ६० लाख ८९ रुपयांचे कर्ज होते. या कर्जावर चढलेले १२० कोटी २१ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज माफ झाले होते. या व्याजमाफीकरिता राज्य शासनाकडून ६० कोटी १५ लाख ८६ हजार तर केंद्र शासनाकडून ६० कोटी १५ लाख ८६ हजार रुपयांचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले होते.

Web Title: 9 3,648 farmers to get relief from debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.