९४८ दाम्पत्यांचे घडवून आणले मनोमिलन
By admin | Published: February 10, 2017 01:30 AM2017-02-10T01:30:50+5:302017-02-10T01:30:50+5:30
पती-पत्नीत झालेल्या वादाची तक्रार पोलिसात पोहोचताच त्यांना महिला सुरक्षा कक्षाचा मार्ग दाखविण्यात येतो.
पुनर्भेट सोहळा : महिला सुरक्षा कक्षाची कामगिरी
वर्धा : पती-पत्नीत झालेल्या वादाची तक्रार पोलिसात पोहोचताच त्यांना महिला सुरक्षा कक्षाचा मार्ग दाखविण्यात येतो. या कक्षात आलेल्या १ हजार ८१ तक्रारींपैकी आतापर्यंत ९४८ प्रकरणांचा निपटरा करण्यात आला. तर ४३४ प्रकरणात समझोता करण्यात आला. या प्रकरणातील पती-पत्नींची पुनर्भेट करण्याकरिता गुरुवारी महिला सुरक्षा विशेष कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा तर्फे पोलीस मुख्यालयातील आशीार्वाद हॉल सोहळा पार पडला.
या सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, पोलीस उपअधीक्षक किल्लेकर, समाजसेविका इंदुमती वानखेडे, सामान्य रुग्णालय स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. वावरे, डॉ. हिवराळे, प्रजापती ब्रम्हकुमारी संस्थेच्या माधुरीदीदी, सेवाग्राम हॉस्पीटल येथील डॉक्टरांची चमू तसेच कुंभलकर कॉलेज येथील विद्यार्थ्यांची चमू उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमात सेवाग्राम हॉस्पीटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात डॉ. वावरे यांनी स्त्रीयांचे आजार, घ्यावयाची काळजी व उपचार इत्यादींवर मोलाचे मार्गदर्शन केले. या सोहळ्यांमध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले व त्यामध्ये स्मार्ट जोडप्यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे वर्धा पालीस विभागातील कर्मचाऱ्यांनी सायबर क्राईम संबंधित घडणाऱ्या गुन्ह्यासंबंधाने दक्षता घेण्याकरिता व जागरुकता आणण्याकरिता पथनाट्याचे सादरीकरण केले. तसेच कुंभलकर कॉलेज येथील विद्यार्थ्यांची चमूनी हुंडाबळी, कौटुंबिक वाद संबंधाने वादाचे निवारण करण्याकरिता पथनाट्याचे सादरीकरण केले.
कौटुंबिक वाद सोडविण्याकडे पोलिसांचे लक्ष
वर्धा : कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक अंकीत गोयल म्हणाले की, कौटुंबिक वाद सोडविणे हा पोलिसांचा मुख्य उद्देश आहे. कौटुंबिक वादामुळे कुटुंबात मतभेद निर्माण होतात. ते मतभेद दुर करण्याचे काम महिला सुरक्षा कक्षातील समुपदेशन केंद्रातून यशस्वीरित्या केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सुरक्षा कक्ष, प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पी.टी. एकुरके यांनी केले. यावेळी इंदुमती वानखेडे, समाजसेविका, प्रजापती ब्रम्हकुमारी संस्थेच्या माधुरीदीदी यांनी कौटुंबिक वादावर तोडगा तसेच सकारात्मक विचार तसेच आरोग्य कशाप्रकारे कुटुंब जोडून ठेवते यावर मनोगत व्यक्त केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यात पोलीस अधीक्षक गोयल व इतर मान्यवरांचे हस्ते आपसी समझोता झालेल्या जोडप्यांना नांदा सौख्यभरे ट्रॉफी प्रदान करण्यात आली. तसेच आपसी समझोता झालेल्या यशस्वी जोडप्यांनी आपआपले अनुभव व महिला सुरक्षा कक्षाने संसार यशस्वी करण्याकरिता केलेले मार्गदर्शन याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेकरिता महिला सुरक्षा कक्षातील महिला कर्मचारी सुरेखा खापर्डे, सविता मुडे, अंजू वाघ, विना, अनू राऊत यांनी सहकार्य केले.