९८५ शेतकरी चणा विक्रीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:55 PM2018-06-17T23:55:07+5:302018-06-17T23:55:07+5:30
शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात बियाणे आणि खतांकरिता रक्कम गरजेची असताना नाफेडच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाचे चुकारे देण्यात आले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात बियाणे आणि खतांकरिता रक्कम गरजेची असताना नाफेडच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाचे चुकारे देण्यात आले नाही. शिवाय आॅनलाईन नोंदणी झाली असताना सेलू तालुक्यातील ९८५ शेतकरी चणा ठेवून आहेत.
शेतातील चणा पीक घरी आले. शासनाची खरेदी सुरू होईल. बाजारात असलेल्या दरापेक्षा शासनाने जाहीर केलेला हमीभाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. यातून आलेल्या रकमेतून खरीपाच्या बी-बियाण्याची खरेदी होईल अशी शेतकऱ्यांची आशा पुरती मावळली. अनेक शेतकऱ्यांचा चणा पोत्यात भरून घरीच राहिला. यातून आर्थिक पाठबळ मिळाले नसल्याने पुन्हा एकदा कर्जमाफीचे गुऱ्हाळ सुरू झाले. यात कर्जमाफी झाल्यावरही दुबार कर्ज देण्यास बँका तयार नसल्याने शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभी राहण्याची वेळ आली. चणा उत्पादक शेतकरी आर्थिक दृष्ट्या हतबल झाला आहे.
किसान अधिकार अभियानाने शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला तेव्हा २६ मे रोजी सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलूच्या बाजारपेठेत नाफेडने खरेदी सुरू केली. यावेळी झालेल्या समारंभाप्रसंगी ही खरेदी सुरू राहील असे सांगण्यात आले. या दरम्यान चार दिवसात ३० शेतकऱ्यांचा चणा खरेदी केला व तेव्हापासून खरेदी बंद झाली. आताही खरेदी कधी सुरू होणार याबाबत कुणीही वाच्यता करीत नाही. शुभारंभाप्रसंगी मोठ्या तोºयात वागणारे बाजार समितीचे पदाधिकारी हातवर करीत आहे. पावसाळ्याचे दिवस आहे. माकडांनी घरावरील कवेलूचे तीन तेरा वाजविले. अशात नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा चणा बाजार समितीच्या शेडमध्ये ठेवण्यास अनुमती देण्याची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी असणाऱ्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा साठा असल्याने शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. येत्या दोन दिवसात चण्याची शासकीय खरेदी सुरू झाली नाही तर शेतकºयांच्या आक्रोशाला सामोर जाण्याची वेळ नाफेडवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनेकांची तुरही घरीच
चणा खरेदीच्या पूर्वी तुरीच्या खरेदीतही हाच प्रकार घडला. ऐन वेळी तुरीची खरेदी बंद झाल्याने अनेकांना तुरी व्यापाऱ्यांना पड्या दरात देण्याची वेळ आली. गोदामाचे कारण काढून नाफेडच्यावतीने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमीभावाची आशा मावळल्या. तुरीच्या वादातच चण्याची खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच फसगत झाल्याचे बोलले जात आहे.