९ महिन्यांची बालिका घेऊन पळालेला पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:10 AM2019-01-20T00:10:12+5:302019-01-20T00:10:54+5:30
चॉकलेटच्या बाहाण्याने ९ महिन्याच्या बालिकेला घेऊन पसार झालेल्या आरोपीला काही तासातच अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली. निलेश कमलाकर अंबाडरे (३१) रा. तहसील वॉर्ड, हिंगणघाट असे आरोपीचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : चॉकलेटच्या बाहाण्याने ९ महिन्याच्या बालिकेला घेऊन पसार झालेल्या आरोपीला काही तासातच अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली.
निलेश कमलाकर अंबाडरे (३१) रा. तहसील वॉर्ड, हिंगणघाट असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी विद्या अनंतराव नेहारे रा. नाचणगांव या घरी असताना त्यांच्या बहिणीचा दीर निलेश हा १८ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता त्यांच्या घरी गेला. त्याने विद्या यांना सोबत चलण्याचा आग्रह केला. जाण्यास नकार दिल्याने निलेशने त्यांची लहान मुलगी अनुश्री हिला चॉकलेट घेऊन देतो, असे सांगून सोबत घेऊन गेला. बराच वेळ झाल्यावर परतला नसल्याने शोधाशोध केली असता कुठेही दिसून आले नाही, अशी तक्रार त्यांनी पुलगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. बालिका ९ महिन्याची असल्यामुळे तिच्या जीवाला धोका होण्याची संभावना होती. म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक नीलेश ब्राह्मणे यांना या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना केल्या. यावरुन तपासाकरिता २ अधिकारी व तीन पथक नेमले. हे पथक पुलगांव व हिंगणघाट येथे पाठविण्यात आले. आरोपी हिंगणघाट तालुक्यातील वालदूर येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने लगेच गाव गाठून आरोपीला बालिकेसह ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार महेंद्र इंगळे, आशिष मोरखेडे, दिवाकर परीमल, परवेज खान, दीपक जाधव, आनंद भस्मे, दिनेश बोथकर, राकेश आष्टनकर यांनी केली.