वर्ध्यात ९ हजार ५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त, दोघांकडून ७५ हजाराचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 04:38 PM2017-11-03T16:38:57+5:302017-11-03T18:35:36+5:30
वर्धा नगर पालिकेच्या विशेष पथकाने मारोती ट्रेडींग कंपनीच्या गोदामावर शुक्रवारी छापा टाकून कमी जाडीच्या ९ हजार ५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या
वर्धा : कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे. परंतु, त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने या प्रकाराला आळा घालण्यासाठी वर्धा नगर पालिकेच्या विशेष पथकाने मारोती ट्रेडींग कंपनीच्या गोदामावर शुक्रवारी छापा टाकून कमी जाडीच्या ९ हजार ५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. जप्त केलेला सदर मुद्देमाल सुमारे पाच लाखाच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.
वर्धा नगर पालिकेच्यावतीने गत दोन दिवसांपासून शहरात प्लास्टिक निर्मुलनासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. पहिल्या दिवशी पालिका कर्मचाºयांनी काही छोट्या व्यावसायिकांना २० हजाराचा तर दुसºया दिवशी १५ हजारांचा दंड ठोठावला होता. याच पाश्वभूमीवर शुक्रवारी पालिकेच्या विशेष पथकातील काही कर्मचाºयांनी इतवारा बाजार परिसरात छापा टाकून एका व्यावसायिकाकडून कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्या जप्त केल्या. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे न.प.च्या पथकाने आपला मोर्चा थेट शहरातील बच्छराज जिनिंगकडे वळविला. या जिनिंगमधील एका गोदामाची न. प. कर्मचाºयांनी पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. सदर गोदाम मारोती ट्रेडींग कंपनीचे राजेश बुधवारी यांच्या मालकीचे असल्याचे पालिका कर्मचाºयांच्यावतीने सांगण्यात आले. या गोदामातून पालिकेच्या कर्मचाºयांनी सुमारे पाच लाख रुपये किंमतीच्या ९ हजार ५०० किलो कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहे. शिवाय सदर व्यावसायिकाकडून न.प. कर्मचाºयांनी ७० हजारांचा दंड वसूल केला. या कारवाईपूर्वी इतवारा बाजार चौकातील एका व्यावसायिकाकडून पालिका कर्मचाºयांनी ५ हजारांचा दंड वसूल केला. ही कारवाई न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, न.प. प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांच्या नेतृत्त्वात प्रवीण बोरकर, अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, स्रेहा मेश्राम, नवीन गोन्नाडे, गुरूदेव हटवार, लंकेश गोडेकर आदींनी केली.
कारवाई टाळण्यासाठी अनेकांचे फोन
वर्धा नगर पालिकेच्या कर्मचाºयांनी कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात छापा टाकून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. जप्त केलेल्या ९ हजार ५०० किलो प्लास्टिक पिशव्या ट्रॅक्टर ट्रॉलीत लादून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. कारवाई टाळण्यासाठी न.प.च्या कार्यवाही करणाºया कर्मचाºयांना काही न.प. पदाधिकारी व काही प्रतिष्ठित नागरिकांचे फोन आल्याची घटनास्थळी चर्चा होती. परंतु, न.प. कर्मचाºयांनी त्याला न जुमानता आपली कारवाई कायम ठेवली.