राज्यात ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 12:10 PM2021-06-14T12:10:21+5:302021-06-14T12:11:44+5:30

Wardha News राज्यात शेतकऱ्यांकडील गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी लिंग विनिश्चित वीर्यमात्रेचा वापर करून उच्च अनुवंशिकतेच्या कालवडी किंवा पारड्यांची निर्मिती केली जाणार आहे.

90% high calf female calves will be produced in the state | राज्यात ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती होणार

राज्यात ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती होणार

googlenewsNext
ठळक मुद्देपशुसंवर्धन विभागाचा निर्णय वीर्यमात्रा केवळ ८१ रुपयांना उपलब्ध करून देणार

 लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : राज्यात शेतकऱ्यांकडील गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी लिंग विनिश्चित वीर्यमात्रेचा वापर करून उच्च अनुवंशिकतेच्या कालवडी किंवा पारड्यांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये राज्यात आता ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती होणार आहे. ही वीर्यमात्रा केवळ ८१ रुपयांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे.

सन २०१७ च्या २० च्या पशुगणनेनुसार राज्यामध्ये निसर्ग नियमानुसार सरासरी ५० टक्के नर व ५० टक्के मादी वासरांचे प्रमाण होते. राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे. तसेच, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण यामध्ये वाढ झाल्याने शेती कामाकरिता उपयोगी असलेल्या बैलांची आवश्यकता कमी झालेली आहे. त्यामुळे कृत्रिम रेतनाद्वारे जन्मास येणाऱ्या अतिरिक्त नर वासरांचे संगोपन करण्यासाठी पशुपालकांना अनावश्यक खर्च सोसणे भाग पडत होते. त्यामुळेच पशुसंवर्धन विभागाने हा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे. नर वासरांची पैदास न्यूनतम पातळीवर ठेवण्याच्या हेतूने पारंपरिक वीर्यमात्रेऐवजी लिंगविनिश्चित वीर्यमात्रा या नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादित केलेल्या वीर्यमात्रांचा क्षेत्रिय स्तरावर गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमाअंतर्गत वापर केल्यास जवळपास ९० टक्के मादी वासरांची निर्मिती करणे शक्य होणार आहे. लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यमात्रांची किंमत १ हजार ते १ हजार २०० रुपये प्रती लिंगविनिश्चित वीर्यमात्रा एवढी असल्याने पशुपालकांमध्ये त्याबद्दल उत्साह आढळून येत नव्हता. तंत्रज्ञानामुळे खासगी संस्थांकडून काही काळापासून अवलंब करूनही क्षेत्रीय स्तरावर गाई-म्हशींच्या कृत्रिम रेतनासाठी वापर करणे शक्य होत नव्हते. पशुसंवर्धन विभागाच्या महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाने लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यमात्रा एबीएस इंडिया यांच्याकडून ५७५ रुपयांना प्रतिमात्रा दराने खरेदी करून ५ वर्षात एकूण ६ लाख ८० हजार रेतमात्रांचा वापर राज्यातील शेतकरी, पशुपालकांकडून गाई-म्हशींना कृत्रिम रेतनासाठी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यात ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मितीही होऊन भविष्यात राज्याचे दूध उत्पादन वाढण्यास मदत होईल, असा विश्वास पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे.

केंद्र व राज्य शासनाचे मिळणार साहाय्य

एका लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यमात्रेची किंमत ५७५ रुपये असून २६४ रुपये केंंद्र शासनाचा हिस्सा, तर १७४ रुपये राज्य शासनाचा हिस्सा असून उर्वरित १४० रुपयांपैकी १०० रुपये दूध संघामार्फत व जेथे दूध संघ कार्यरत नाही, अशा ठिकाणी हा खर्च महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ करणार आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या गाई किंवा म्हशींमध्ये लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यमात्रा वापरून कृत्रिम रेतन केलेले आहे, अशा शेतकऱ्यास उर्वरित ४० रुपये अधिक कृत्रिम रेतनासाठी शासनास देय असलेले सेवाशुल्क ४१ रुपये, असे फक्त ८१ रुपये अदा करावे लागणार आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना ज्या लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यमात्रा १ हजार ते १ हजार २०० रुपये दरामध्ये उपलब्ध होत होत्या, त्याच वीर्यमात्रा आता ८१ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहेत.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे. त्यांचे जीवनमान उंचावणारा हा पशुसंवर्धन विभागाचा निर्णय आहे. फिरत्या पशुचिकित्सालयांद्वारे व पशुसंवर्धन विभागाच्या प्रत्येक अधिकारी- कर्मचारी यांच्यामार्फत या उपक्रमाची माहिती शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत.

- सुनील केदार, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकासमंत्री

Web Title: 90% high calf female calves will be produced in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cowगाय