जि.प.च्या ९१ टक्के शाळा झाल्या डिजिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:50 AM2018-06-30T00:50:07+5:302018-06-30T00:50:54+5:30
जिल्ह्यात एकूण १ हजार ५१९ प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या ९२५ पैकी तब्बल ८३९ शाळा डिजिटल झाल्या आहेत. यामुळे आता खासगी शाळा, कॉन्व्हेंटमधील विद्यार्थीही जि.प. च्या शाळांकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.
गौरव देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात एकूण १ हजार ५१९ प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या ९२५ पैकी तब्बल ८३९ शाळा डिजिटल झाल्या आहेत. यामुळे आता खासगी शाळा, कॉन्व्हेंटमधील विद्यार्थीही जि.प. च्या शाळांकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे.
जि.प. प्राथमिक, माध्यमिक, नगर परिषद, शासकीय शाळा व खासगी शाळा अशा १ हजार ५१९ शाळा जिल्ह्यात आहे. यात जि.प. प्राथमिक ९२५ तर माध्यमिक दोन शाळा आहे. नगर परिषदेच्या ४६ प्राथमिक व सात माध्यमिक, शासकीय शाळा प्राथमिक ४ व माध्यमिक ५ तर खासगी प्राथमिक १९८ व माध्यमिक ३३२ शाळा आहेत. प्राथमिकच्या एकूण १ हजार १७३ तर माध्यमिकच्या ३४६ शाळा आहेत. यात जि.प.च्या ९२५ पैकी ८३९ म्हणजे ९१ टक्के शाळा डिजीटल झाल्या असून तेथे अद्यावत संगणकीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. जि.प. शाळेतील १०० टक्के शिक्षकांचे तंत्रस्नेही प्रशिक्षण पूर्ण झालेले मागील वर्षात ६६५ विद्यार्थी इंग्रजी कॉन्व्हेंटमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशित झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या शाळासिद्धी मूल्यमापन तंत्राद्वारे स्वयंमूल्यमापन करून घेतल्यानुसार जिल्ह्यातील जि.प. च्या ३६ टक्के शाळा अ श्रेणीत असल्याची घोषणा केल्याची माहिती आहे. शासनाच्या विविध सर्वेक्षणातून प्रत्येक विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर निश्चित करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यात भागाकार करता येणारे ८६ टक्के, वाचन क्षमता प्राप्त करणारे ९० टक्के विद्यार्थी असल्याचेही सांगण्यात आले आहे.
जि.प. शाळांत मोफत गणवेश वाटप, शालेय पोषण आहार, अपंग समावेशित योजना, शाळा अनुदान, देखभाल व दुरूस्ती अनुदान, शैक्षणिक साहित्य अनुदान, शिक्षकांचे व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, स्काऊट गाईड योजना, खेळ क्रीडा व सांस्कृतिक कार्यकम तथा विविध योजना राबविल्या जात असल्याचेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिचय व विविध स्पर्धा परीक्षेलाही मुलांना बसविण्यात येते. विविध उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्येत वाढ होत असल्याचेच दिसून येत आहे.
नवोपक्रमामुळे पटसंख्येत सुधार
मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विविध नवोपक्रम राबविले जात आहे. तंत्रस्रेही शिक्षकांमुळे ९१ टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. अनेक शाळांमध्ये एलईडी, एलसीडी, संगणक, टॅब यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शिवाय अध्यापनाच्या नवनवीन पद्धतीही विकसित केल्या जात आहेत. यामुळे खासगी शाळांतील विद्यार्थी जि.प. शाळांकडे आकर्षित होत असून पटसंख्येत सुधारणा झाल्याची माहिती आहे.