वर्ध्यात ९४ हजारांच्या बनावट नोटा जप्त; चौघांना ठोकल्या बेड्या
By चैतन्य जोशी | Published: March 17, 2023 02:42 PM2023-03-17T14:42:55+5:302023-03-17T14:44:23+5:30
टोळीचा पर्दाफाश
वर्धा : बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा वर्ध्यात पोलिसांनी पर्दाफाश केला असून, चार जणांच्या टोळीला गुरुवारी रात्री अटक केली. हे रॅकेट मागील काही दिवसांपासून शहरात सक्रिय झाले हाेते. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी पवनार येथील तीन, मदनी गावातून एका आरोपीला अशा चार आरोपींच्या टोळीला अटक केली.
विशेष म्हणजे त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या बनावट नोटा अशी एकूण ९४ हजार रुपयांची रोकडही जप्त केली. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात क्राईम इंटेलिजन्स पथक या टोळीच्या मागावर होते.
बनावट नोटांचे ‘दिल्ली’ कनेक्शन...
चारही आरोपी हे दिल्ली येथून तसेच लगतच्या मोठ्या शहरातून या बनावट नोटा वर्धासह लगतच्या शहरात आणत होते. इतकेच नव्हे, तर पानटपरी, पेट्राेलपंप तसेच बाजारपेठेत या बनावट नोटा चालवत असल्याची माहिती पोलिस विभागाकडून प्राप्त झाली आहे.
प्रीतम प्रदीप हिवरे (२३, रा. पवनार), स्वप्निल किशोर उमाटे (२४, रा. पवनार), निखिल अशिनराव लोणारे (२४, रा. श्रीराम टाऊन वर्धा), साहिल नवनीतराव सकरकर (२३, रा. पवनार) यांना बनावट नोटा चलन करताना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सर्व आरोपींकडून ५०० रुपयांच्या तब्बल १८८ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.