पोलिसाच्या ५६ जागांसाठी ९,५१० अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:26 AM2018-03-14T00:26:37+5:302018-03-14T00:26:37+5:30
सध्याच्या विज्ञान युगात विविध शाखेचे अनेक महाविद्यालयातून तरुण-तरुणी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : सध्याच्या विज्ञान युगात विविध शाखेचे अनेक महाविद्यालयातून तरुण-तरुणी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. परंतु, उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या तुलनेत सध्या रोजगाराच्या संधी कमी असल्याचे वास्तव आहे. नुकतीच महाराष्ट्र पोलीस सेवेची वर्धा जिल्ह्याची पोलीस भरती प्रक्रिया सूरू झाली असून जिल्ह्यातील ५६ जागांसाठी ९ हजार ५१० इच्छुकांनी आवेदन केले आहे. गत दोन दिवसात मैदानी व शारीरिक चाचणी देण्यासाठी ५८६ महिलस व पुरुष उमेदवार पोलीस मैदानावर उतरले.
स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील ५६ जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. सदर ५६ जागांपैकी ३० टक्के जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील केवळ ५६ जागांसाठी ९ हजार ५१० इच्छुक तरुण-तरुणींनी आवेदन सादर केले आहे. त्यात १ हजार ७२९ महिला तर ८ हजार २५७ पुरुषांचा समावेश आहे.
सदर पोलीस भरती प्रक्रियेचा एक भाग म्हणून सोमवार १२ मार्चपासून शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. सोमवार व मंगळवारी घेण्यात आलेल्या शारीरिक व मैदानी चाचणीसाठी एकूण १ हजार ७० महिला व पुरुष उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. त्यापैकी ५८६ महिला व पुरुषांनी सदर चाचणीत प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यापैकी काही उमेदवार सदर चाचणीत पात्र ठरले तर काही उमेदवार या चाचणीत अपात्र ठरले आहेत. ही शारीरिक व मैदानी चाचणी रविवार हा सुट्टीचा दिवस वगळता २८ मार्चपर्यंत भरती प्रक्रिया पारदर्शी व्हावी म्हणून आॅन कॅमेरा पद्धतीने निरंतर सुरू राहणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
बँडमॅनच्या चार जागांसाठी १ हजार ७० आवेदन
बँडमॅनच्या चार जागांसाठी एकूण १ हजार ७० जणांनी आवेदन केले आहेत. त्यात १०८ महिलांचा समावेश आहे. सदर चार जागांच्या पद भरतीसाठी सोमवारी ५२३ पुरुष उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. त्यापैकी २९० पुरुष उमेदवारांनी मैदानी व शारीरिक चाचणी दिली. यात २५६ उमेदवार पात्र तर ३४ अपात्र ठरले आहेत. तर मंगळवार १३ मार्चला ४३९ पुरुष व १०८ महिला उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. त्यापैकी २४४ पुरुष तर ५२ महिला उमेदवारांनी प्रत्यक्ष हजर राहून सदर चाचणी दिली. मंगळवारच्या चाचणीत २१० पुरुष तर ४० महिला पात्र ठरल्या. ३४ पुरुष व १२ महिला उमेदवार चाचणीत अपात्र ठरले आहे.
गोळाफेक, लांब उडीसह धावण्याची चाचणी
गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेचा एक भाग असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांच्या शारीरिक व मैदानी चाचणी दरम्यान १०० मिटर, १६०० मिटर व ८०० मिटर धावणे, गोळाफेक, लांब उडी आदी चाचण्या घेण्यात येत आहेत. ही पोलीस भरती प्रक्रिया रविवार वगळता २८ मार्चपर्यंत निरंतर सुरू राहणार आहे.
भरती प्रक्रिया आॅन कॅमेरा
सुरू असलेली पोलीस भरती प्रक्रियेत पादर्शता रहावी या हेतूने ही प्रक्रिया आॅन कॅमेरा घेतल्या जात आहे. कुठलाही उमेदवार पोलीस मुख्यालयाच्या मैदानात भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आल्यास तो मुख्य प्रवेश द्वारापासूनच कॅमेरात कैद होण्यास सुरूवात होत असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. मैदानी व शारीरिक चाचणी झाल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनूसार लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
दोन दिवसात ८० उमेदवार बाद
सोमवार १२ मार्च पासून सुरू झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत सोमवार व मंगळवारी बँड मॅनच्या चार जागांसाठी शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आली. या दोन्ही दिवशीच्या शारीरिक व मैदानी चाचणीत एकूण ८० उमेदवार अपात्र ठरले आहेत.