सारस्वतांच्या कुंभमेळ्याकरिता साहित्यनगरी चकाचक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 06:23 PM2023-02-02T18:23:51+5:302023-02-02T18:24:24+5:30
श्रमदानातून स्वच्छता अभियान : विविध स्वयंसेवी संघटनांचा सहभाग
वर्धा : शहरातील ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकरिता देशभरातून साहित्यिक व पाहुण्यांची उपस्थिती राहणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी चकाचक करण्यात आली. बुधवारी सकाळी वर्ध्यातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’चा नारा देत श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविली.
स्वावलंबी विद्यालयाच्या प्रांगणावर ३ ते ५ फेब्रुवारीला सारस्वतांचा महाकुंभमेळा भरणार असून, यासाठी साहित्यनगरी सज्ज झाली आहे. तसेच शहरातील विविध मार्ग आणि या मार्गावरील दुभाजकांचीही स्वच्छता करण्यात आली. या अभियानात माजी नगर परिषद सदस्य, नगर परिषदेचे अधिकारी, स्वच्छता कर्मचारी, आयोजन समिती व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
महात्मा गांधी पुतळा, बाबासाहेब आंबेडकर ते झाशी राणी चौक, पोस्ट ऑफिस, झाशी राणी चौक ते आदिती मेडिकल, आदित्य मेडिकल ते आर्वी नाका चौक, आर्वी नाका येथील तुकडोजी महाराज चौक, पावडे चौक ते संमेलन स्थळ, जिल्हा सामान्य रुग्णालय ते शासकीय ग्रंथालय मार्ग, बस स्थानक ते रेल्वे स्थानक मार्ग, आर्वी नाका व महात्मा गांधीजी पुतळा ते सेवाग्राम रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मुख्याधिकारी राजेश भगत यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारीदेखील शहराच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
या संघटनांचा मोहिमेत होता सहभाग
या स्वच्छता मोहिमेमध्ये निसर्ग सेवा समिती, बहार नेचर फाउंडेशन, पतंजली योग समिती, जनहित मंच, माजी सैनिक संघटना, प्रहार समाज जागृती संस्था, ज्येष्ठ नागरिक आधारवड संघटना, वैद्यकीय जनजागृती मंच, नीमा संघटना, वर्धा सोशल फोरम, रोटरी क्लब ऑफ गांधी सिटी लायन्स क्लब, वर्धा फ्लागर्स, सेवानिवृत्त इंजिनीअर, पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया आदी संघटनांचा सहभाग होता.
संमेलनाध्यक्ष न्या. चपळगावकर वर्ध्यात दाखल
९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे बुधवारी दुपारी सपत्नीक राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीमध्ये दाखल झाले. त्यांचे आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयातील अतिथीगृहात स्वागत करण्यात आले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ३ फेब्रुवारीला होणार असून, संमेलनस्थळी बुधवार, १ फेब्रुवारीपासूनच विविध कार्यक्रमांना सुुरुवात झाली आहे. सारस्वतांच्या या महाकुंभमेळाची तयारी पूर्ण झाली असून, शहरामध्ये वातावरण निर्मितीही व्हायला लागली आहे. आज बुधवारी संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, त्यांच्या पत्नी नंदिनीताई व मुलगी भक्ती हे तिघेही औरंगाबाद येथून समृद्धी महामार्गाने प्रवास करीत वर्ध्यात दाखल झाले. त्यांची राहण्याची व्यवस्था आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयातील अतिथीगृहात करण्यात आल्याने त्यांचे त्या ठिकाणी आगमन झाले. तेथे आयोजन समितीच्या वतीने त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. त्यांनी सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आश्रम आणि पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांचा परमधाम आश्रम बघण्याची इच्छा व्यक्त केली असून, ते या ठिकाणी भेट देतील, असेही सांगण्यात आले.