'राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी'ला येणार पोलिस छावणीचे स्वरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 03:35 PM2023-02-01T15:35:49+5:302023-02-01T15:41:48+5:30
पोलिस विभागाला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा
वर्धा : येथील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर ३ ते ५ फेब्रुवारी या काळात ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संबंधित २३ एकरांच्या मैदानाला 'राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी' असे नवीन नाव देण्यात आले आहे.
स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या भागात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. असे असले तरी झेड प्लस सुरक्षा असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्धा दौऱ्याबाबतच्या अधिकृत लेखी सूचना वर्ध्याच्या पोलिस विभागाला प्राप्त झालेल्या नाहीत. व्हीव्हीआयपींच्या वर्धा दौऱ्याच्या लेखी सूचना लवकरच प्राप्त होतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असून, पोलिस विभागाने बंदोबस्ताचा नियोजनबद्ध संभाव्य आराखडा तयार केला आहे.
हे व्हीव्हीआयपी येणार
वर्धा येथे होऊ घातलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, पूर्वाध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ताजी मेघे, प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हिंदी साहित्यिक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, विशेष अतिथी म्हणून आ. डॉ. विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत.
४२ समित्यांचे लाभतेय सहकार्य
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीचे काम युद्ध पातळीवर पूर्ण होत आहे. स्वावलंबी विद्यालयाच्या २३ एकरांतील मोकळ्या मैदानात मंडप व विविध दालने उभारली जात असून, विविध ४२ समित्यांचे यशस्वितेकरिता सहकार्य घेतले जात आहे.
ग्रंथप्रदर्शन अन् विक्रीची ३०० दालने
संमेलनस्थळी ग्रंथप्रदर्शन व विक्रीची मुख्य मंडपापासून काही अंतरावर ३०० स्वतंत्र दालने करण्यात आली आहेत. येथे होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन दालनांत समोरासमोर पुरेशी मोकळी जागा ठेवण्यात आली आहे.
२० दालनांतून होणार शासकीय योजनांचा जागर
संमेलनस्थळी एकूण ३०० दालने असून त्यांपैकी २८० दालने ही राज्य व राज्याबाहेरून येणाऱ्या प्रकाशकांसाठी राखीव आहेत; तर २० दालनांमध्ये विविध शासकीय विभागांचे स्टॉल राहणार आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे.
पाच सभामंडप
* संमेलनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी मैदानात वेगवेगळ्या आकारांचे एकून पाच सभामंडप उभारले जात आहे.
* मुख्य सभामंडप १६० बाय ३५० फुटांचा आहे.
* दुसरा सभामंडप ८० बाय १२० फुटांचा आहे.
* अन्य तीन सभामंडप प्रत्येकी ८० बाय ६० फुटांचे आहे.
- ७,५०० खुर्च्या मुख्य मंडपात
- २,००० खुर्च्या अन्य मंडपात
- ३५० निमंत्रित वक्ते अन् साहित्यिक
- २,००० प्रतिनिधी राज्य व राज्याबाहेरील
- १,००,००० साहित्य रसिक देणार भेट