खादीच्या दोरखंडाने ‘९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ शब्दबद्ध!
By महेश सायखेडे | Published: February 4, 2023 10:50 AM2023-02-04T10:50:57+5:302023-02-04T10:51:40+5:30
२४ तासांत झाले काम फत्ते : शंभर मीटर बारदानाचाही वापर
वर्धा : कधी आवर घालण्यासाठी, तर कधी एकत्र बांधण्यासाठी दोरखंडाचा वापर केला जातो. असे असले तरी वर्धा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शब्दबद्ध करण्यासाठी चक्क खादीच्या दोरखंडाचा वापर झाल्याचे वास्तव आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीतील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावरून शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटनाचा मुख्य सोहळा पार पडला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. याच व्यासपीठावर ३० फूट बाय १२ फूट आकाराचा फलक लावण्यात आला आहे. हा फलक ८० मीटर बारदान्याचा वापर करून तयार करण्यात आला असून, त्यावर ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शब्दबद्ध करण्यासाठी १०० मीटर खादीच्या दोरखंडाचा वापर झाला आहे. विशेष म्हणजे हा मुख्य फलक अवघ्या २४ तासांत आशिष पोहाणे, सुभाष राठोड, प्रवीण राडे, संजय पुसाम, किशोर उकेकर, किशोर शेंद्रे, प्रमोद चौधरी, रवी मुटे, मनोज बाचले यांनी तयार केला.
जवळून बघिल्यावर उलगडते वास्तव
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीतील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर लावण्यात आलेला फलक जवळून बघितल्यावरच त्या फलकावरील ‘९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा’ हे खादीच्या दोरखंडाचा वापर करून शब्दबद्ध झाल्याचे वास्तव दिसून येते; पण दुरून बघितल्यावर हा फलक जणू प्रिंटिंग मशीनचा वापर करून तयार केला असल्याचे भासते हे उल्लेखनीय.
कापसाच्या पेळूतून साकारले ग. त्र्यं. मांडखोलकर
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीतील ग. त्र्यं. मांडखोलकर प्रकाशन मंचातही बारदान्याचा वापर करून व्यासपीठावर मोठा फलक लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच फलकावर कापसाच्या पेळूचा वापर करून ग. त्र्यं. मांडखोलकर यांचे चित्र साकारण्यात आले आहे.
संमेलनस्थळी रांगोळीतून ‘गांधी-विनोबा’
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीतील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठासमोर आकर्षक अशी रांगोळी रेखाटण्यात आली आहे. २०० किलो रांगोळीचा वापर करून स्वयंसेविकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, तसेच बापूकुटी आणि चरखा रेखाटण्यात आला आहे. संमेलनात आलेल्या रसिक व साहित्यिकांना ही रांगोळी भुरळ घालत आहे.