कोराेनायनातील दहा महिन्यांत सापडले 99 डेंग्यू पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 05:00 AM2020-12-06T05:00:00+5:302020-12-06T05:00:11+5:30
डेंग्यूची लक्षणे असलेले रुग्ण खासगी किंवा शासकीय रुग्णालयात गेल्यावर त्याची माहिती वेळीच जिल्हा हिवताप विभागाला देण्यात आली. त्यानंतर या रुग्णांना वेळीच चांगली आरोग्य सेवा देण्यात आल्याने यंदाच्या वर्षी एकाही डेंग्यू बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी जिल्ह्यात तब्बल ७२ डेंग्यू बाधित आढळले होते. त्यापैकी तीन व्यक्तींचा डेंग्यूमुळे मृत्यूही झाला होता.
लाेकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षी कोरोनाच्या भीतीमुळे अनेक व्यक्तींनी उन्हाळा संपताच आपल्या घरातील कुलर काढून घेतले. तर गाव पातळीवरही विविध किटकजन्य आजारांबाबत आरोग्य यंत्रणेकडून प्रभावी जनजागृती करण्यात आल्याने किटकजन्य आजार अशी ओळख असलेल्या डेंग्यूला रोखण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. असे असले तरी मागील दहा महिन्यांमध्ये जिल्ह्यात एकूण ९९ व्यक्तींना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद जिल्हा हिवताप विभागाने घेतली आहे.
डेंग्यूची लक्षणे असलेले रुग्ण खासगी किंवा शासकीय रुग्णालयात गेल्यावर त्याची माहिती वेळीच जिल्हा हिवताप विभागाला देण्यात आली. त्यानंतर या रुग्णांना वेळीच चांगली आरोग्य सेवा देण्यात आल्याने यंदाच्या वर्षी एकाही डेंग्यू बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी जिल्ह्यात तब्बल ७२ डेंग्यू बाधित आढळले होते. त्यापैकी तीन व्यक्तींचा डेंग्यूमुळे मृत्यूही झाला होता. तर यंदा पावसाळ्याच्या तोंडावरच जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून किटकजन्य आजार आणि कोविड-१९ विषाणूच्या संसर्गापासून नागरिक कसे दूर राहू शकतात याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.या जनजागृती मोहिमेदरम्यान सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या व्यक्तींनी दुखणे अंगावर न काढता वेळीच याची माहिती अंगणवाडी सेविकेला देत नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याचे आवाहनही करण्यात आले होते. या मोहिमेला वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
खासगी रुग्णालयही देत डेंग्यू रूग्णांची माहिती
डेंग्यूची लक्षणे असलेल्या रुग्णांवर खासगी डॉक्टर औषधोपचार करीत असले तरी त्या रुग्णाची माहिती खासगी रुग्णालयांकडून जिल्हा हिवताप विभागाला दिली जाते. त्यानंतर या रुग्णाचे सिरम शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाते असल्याचे सांगण्यात आले.
डेंग्यूची लक्षणे
अचानक जोराचा ताप येणे. डोक्याचा पुढचा भाग खूप दुखणे. डोळ्याच्या मागील भागात वेदना होणे. स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना होणे. छाती आणि त्यावर गोवरासारखे पुरळ येणे. मळमळणे आणि उलट्या होणे. त्वचेवर व्रण उठणे.
मागील वर्षी जिल्ह्यात डेंग्यूची ७२ रुग्ण आढळली होती. तर तिघांचा डेंग्यूमुळे मृत्यूही झाला हाेता. तर यंदा डेंग्यूचे ९९ रुग्ण आढळले आहेत. गत वर्षीच्या तुलनेत हा आकडा जास्त असला तरी जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या सहकार्यामुळेच डेंग्यू आजाराचे मृत्यू रोखण्यात आम्हाला यश आले आहे. आरोग्य यंत्रणा कोरोनासोबतच अन्य आजारांवर लक्ष ठेवून आहे.
- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा.