नवपिढीच्या जनजागृतीसाठी ७३ वर्षीय चिरतरुणाची सायकलवारी; श्रीनगर ते कन्याकुमारी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 06:04 PM2022-11-23T18:04:16+5:302022-11-23T18:06:19+5:30
पवनार, बजाजवाडी, सेवाग्रामला दिली भेट
वर्धा : युवा पिढी ही या देशाचे भवितव्य असून त्यांना आपल्या देशाची संस्कृती, परंपरा आणि पर्यावरणासंदर्भात माहिती देण्यासाठी ७३ वर्षीय चिरतरुणाने श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत सायकल यात्रा सुरु केली आहे. गावागावात जाऊन ते शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. हा चिरतरुण व्यक्ती मंगळवारी वर्धा जिल्ह्यात दाखल झाला असून त्यांनी पवनार, बजाजवाडी आणि सेवाग्रामला भेट दिली.
किरण सेठ, असे या ७३ वर्षीय चिरतरुणाचे नाव आहे. ते ‘सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक ॲण्ड कल्चर अमंग असिस्टेट युथ’(स्पिक मैके) याचे सदस्य असून आयआयटी दिल्लीमध्ये प्राध्यापक आहे. स्पिक मैकेच्या माध्यमातून युवकांमध्ये भारतीय संस्कृती आणि शास्त्रीय संगीताला चालना देण्यासोबतच लोककला, हस्तकला, शिल्पकला, चलचित्र आदींचा प्रचार-प्रसार व्हावा, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे ‘साधी राहणी, उच्च विचार’ हे जीवनमूल्य रुजावे आणि पर्यावरणाचे संवर्धन केले जावे, या तीन उद्देशाला घेऊन किरण सेठ यांनी श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत ही सायकल यात्रा काढली आहे.
१५ ऑगस्टला श्रीनगर येथून ही यात्रा सुरु झाली असून २ ऑक्टोबरला राजघाट येथे पोहोचली. तेथून ते मंगळवारी वर्ध्यात पोहोचले असून पवनार येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. शिक्षा मंडळाचे सभापती तथा स्पिक मैकेच्या वर्धा चॅप्टरचे संजय भार्गव आणि जी.एस. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी पवनार येथे किरण सेठ यांचे स्वागत करुन त्यांच्यासोबत पवनार ते वर्धा असा सायकल प्रवास केला. बुधवारी ही सायकल यात्रा पुढच्या प्रवासाला निघणार असून फेब्रुवारी महिन्यात या यात्रेचा शेवट होणार असल्याचे सांगण्यात आले.
जी.एस. कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद
नवपिढीच्या जनजागृतीकरिता सायकलने निघालेले किरण सेठ मंगळवारी वर्ध्यात पोहोचले. त्यांनी जी. एस. कॉमर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. देशाची संस्कृती, शास्त्र, कला यासह बापूंचे विचार आणि पर्यावरण यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी सेवाग्राम येथील आनंद निकेतनच्या विद्यार्थ्यांशीही संवाद साधला असून बजाजवाडीमध्ये मुक्काम केला. बुधवारी ते पुढच्या प्रवासाकरिता निघणार आहे.
मिळत असलेला सन्मान अविस्मरणीय : किरण सेठ
स्पिक मैके हे एक स्वयंसेवी आंदोलन असून युवकांमध्ये प्रचार-प्रसार करण्याचे काम करतात. देश-विदेशातील २० लाख संस्थांना भेट देण्याचा मानस आहे. वर्षभरामध्ये ५ हजार संस्थांना भेट देण्याचे लक्ष्य असल्याने ही सायकल यात्रा सुरु केली. या भ्रमंतीदरम्यान हा देश विविधतेने नटलेला असून ग्रामीण भागात आणि लहान शहरामध्ये अजूनही संस्कृती कायम असल्याचे लक्षात आले आहे. येथे मिळालेला मान-सन्मान न विसरणारा असून ‘अतिथी देवो भव’ची प्रचिती आली आहे, असे मत किरण सेठ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. एका दिवसाला ३० ते ६० किलोमीटरपर्यंत प्रवास करीत असून आतापर्यंत २ हजार किमीच्यावर प्रवास करुन ८ ते ९ लाख विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचेही त्यांनी सांगितले.