‘एसएमडब्ल्यू इस्पात’च्या सात अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अल्पवयीन कामगारांना भर उन्हात लावले काम

By रवींद्र चांदेकर | Published: May 30, 2024 07:44 PM2024-05-30T19:44:55+5:302024-05-30T19:49:04+5:30

अल्पवयीन कामगारांना कामावर ठेवून भर उन्हात काम करून घेतल्याचा ठपका 

A case of manslaughter has been registered against seven officials of SMW Ispat | ‘एसएमडब्ल्यू इस्पात’च्या सात अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अल्पवयीन कामगारांना भर उन्हात लावले काम

‘एसएमडब्ल्यू इस्पात’च्या सात अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अल्पवयीन कामगारांना भर उन्हात लावले काम

देवळी (वर्धा) : येथील औद्योगिक वसाहतीतील एसएमडब्लू इस्पात प्रा. लि. कारखान्यातील दोन अस्थायी कामगारांचा मंगळवार रोजी एकाच दिवशी मृत्यू झाला. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याची शंका उपस्थित करून तपासला दिशा देण्यात आली. यात ‘एसएमडब्लू इस्पात’च्या सात अधिकाऱ्यांसह मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मृतात एक कामगार अल्पवयीन असल्याने पोलिसांनी याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून कारखाना प्रशासनाला तसेच मनुष्यबळ पुरविणाऱ्या ठेकेदाराला दोषी पकडले आहे. यातील १७ वर्षीय अल्पवयीन कामगार रितीक कामडी याच्या मृत्यू प्रकरणात एसएमडब्लू इस्पात कारखान्याच्या सात अधिकारी आणि कंत्राटदाराविरुद्ध भादंवि कलम ३०४ अन्वये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय भादंवि कलम ३४ सहकलम १४, बालकामगार अधिनियम सहकलम ९२ व कारखाना अधिनियमाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत अमित मातकर याच्या मृत्यू प्रकरणात भादंवि ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एसएमडब्लू इस्पात मॅनेजमेंटचे मनू जॉर्ज, प्रतीक बिंदल, आशीष भट, ब्रिजेश यादव, श्याम मुंदडा, रमेश नाथ, प्रसाद कुकेकर तसेच कंत्राटदार हर्षल राजू गायकवाड रा. देवळी यांचा समावेश करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या आरोपींमध्ये कारखान्याचे सीईओ, प्लांट हेड, एचआर तसेच इतर अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने चर्चेला उधाण आले. याआधी कारखाना प्रशासनावर अशा पद्धतीची कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत केवळ कंत्राटदार हर्षल गायकवाड याला अटक करण्यात आली होती. उर्वरित काही आरोपी पोलिस ठाण्यात उपस्थित असतानासुद्धा त्यांना अटक करण्यात आली नव्हती. त्यामुळे मृतांच्या दोन्ही कुटुंबीयांत अस्वस्थता दिसून आली.
 
वैद्यकीय सेवा पुरविण्यास लावला वेळ
१७ वर्षीय अल्पवयीन कामगार रितीक ऊर्फ रोशन प्रकाश कामडी याला नियमबाह्यरीत्या कामावर घेतल्याचा तसेच त्याच्याकडून भर उन्हात अवजड काम करून घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अमित प्रमोद पातकर (२१) याच्याबाबत कारखाना प्रशासनाचा निष्काळजीपणा तसेच वैद्यकीय सेवा देण्यात वेळ घालविल्याचा ठपका ठेवण्यात आला. सोबतच दोन्ही मृत्यूसाठी कारखाना प्रशासनाला दोषी ठरविण्यात आले. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण, पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते पुढील तपास करीत आहे.

Web Title: A case of manslaughter has been registered against seven officials of SMW Ispat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-pcवर्धा