शासकीय औषधाच्या अपहाराच्या चौकशीसाठी समिती गठित होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 05:00 AM2022-02-21T05:00:00+5:302022-02-21T05:00:22+5:30

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या अधिकृत एजन्सीने एच. आय. ओ. सी. २०३७ आणि एच. आय. ओ. सी. २०३७ बॅच क्रमांकाच्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा राज्यातील बारा जिल्ह्यांना पुरवठा केला आहे. या अधिकृत एजन्सीने या बॅचच्या २ लाख ४७ हजार १९८ ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा पुरवठा केला असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

A committee will be formed to investigate the embezzlement of government drugs? | शासकीय औषधाच्या अपहाराच्या चौकशीसाठी समिती गठित होणार?

शासकीय औषधाच्या अपहाराच्या चौकशीसाठी समिती गठित होणार?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अवैध गर्भपाताचा अड्डा राहिलेल्या आर्वी येथील कदम हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात तब्बल ९० शासकीय ऑक्सिटोसीन इंजेक्शनसह इतर शासकीय औषधसाठा सापडल्याने आणि त्याच बॅच क्रमांकाच्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा राज्यातील बारा जिल्ह्यांना पुरवठा झाल्याने शासकीय औषधाच्या अपहाराचे केंद्र शोधल्यास गैरप्रकार करणाऱ्यांची मोठी टोळीच गळाला लागण्याची शक्यता असल्याची बाब राज्य पर्यवेक्षकीय मंडळ व पीसीपीएनडीटीच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना पटवून दिली आहे. शिवाय त्यांनी याप्रकरणी राज्यस्तरीय चौकशी समिती गठित करण्याची मागणी निवेदनातून ना. शिंगणे यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी सल्लामसलतीअंती ठोस निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन डॉ. मिरगे यांना ना. शिंगणे यांनी दिले आहे.
त्या ऑक्सिटोसीनचा बारा जिल्ह्यांना पुरवठा
-   गर्भवती महिलेला प्रसुतीकळा येण्यासह प्रसुती झाल्यावर महिलेचा रक्तस्त्राव थांबविण्यासाठी ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा वापर केला जातो. कदम हॉस्पिटलमधून जप्त करण्यात आलेले एमएफजी कंपनी हेल्थ बायोटेक नालागड, बड्डी जि. सोलन, हिमाचल प्रदेश एच. आय. ओ. सी. २०३७ आणि एच. आय. ओ. सी. २०३७ बॅच क्रमांकाचे शासकीय ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा वर्धासह, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, जालना, हिंगोली, उस्मानाबाद, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना एका एजन्सीच्या माध्यमातून पुरवठा करण्यात आला आहे.

एजन्सीने केला २.४७ लाख ऑक्सिटोसीनचा पुरवठा

-   राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या अधिकृत एजन्सीने एच. आय. ओ. सी. २०३७ आणि एच. आय. ओ. सी. २०३७ बॅच क्रमांकाच्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा राज्यातील बारा जिल्ह्यांना पुरवठा केला आहे. या अधिकृत एजन्सीने या बॅचच्या २ लाख ४७ हजार १९८ ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा पुरवठा केला असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

मुख्य आरोपी डॉक्टर दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत
-    शासकीय औषधाच्या अपहाराचे केंद्र शोधण्याच्या उद्देशाने आर्वी पोलिसांनी अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रेखा कदम व रेखा यांचे पती डॉ. निरज कदम यांची नव्या जोमाने सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळवली. पण याच पोलीस कोठडीदरम्यान या दोन्ही आरोपींनी त्यांच्या खासगी रुग्णालयात शासकीय औषध कुठून आले, याची कुठलीही ठोस माहिती पोलिसांना दिली नाही. सध्या डॉ. रेखा आणि डॉ. निरज कदम हे डॉक्टर दाम्पत्य न्यायालयाच्या आदेशान्वये न्यायालयीन कोठडीत असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

 

Web Title: A committee will be formed to investigate the embezzlement of government drugs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.