कंत्राटदाराने सळाखीनंतर सिमेंट काँक्रिटही गिळलं; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्यावर झापड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 03:20 PM2023-02-27T15:20:24+5:302023-02-27T15:23:49+5:30

शिवाजी चौक ते जुनापाणी चौक रस्त्यावरील प्रकार

a contractor theft cement concrete after the iron rods; slap in the face of PWD | कंत्राटदाराने सळाखीनंतर सिमेंट काँक्रिटही गिळलं; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्यावर झापड

कंत्राटदाराने सळाखीनंतर सिमेंट काँक्रिटही गिळलं; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्यावर झापड

googlenewsNext

वर्धा : शहरातील विकासकामांना गती देताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांवर कंत्राटदाराच्या ‘माया’जाळामुळे झापड बांधली की काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. कंत्रादाराने आधी सळाखी गायब केल्या तर आता गट्टू (पेव्हिंग ब्लॉक) लावण्यासाठी सिमेंट काँक्रिटची आवश्यकता असता चक्क चुरीवरच काम सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तीन ते चार वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका, आणि आर्वी नाका ते जुनापाणी चौक या जवळपास तीन किलोमीटर रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्याचे सिमेंटीकरण व चौपदीकरण पूर्ण झाले असून अद्याप काही कामे बाकी आहे. या रस्त्याकरिता साधारण: २० कोटींचा निधी खर्च करण्यात आला. या रस्त्याचे कंत्राट जे. पी. कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलाे असले तरीही प्रत्यक्ष काम वर्धातील तिवारी नामक कंत्राटदार करीत आहे.

या कंत्राटदारावर सार्वजनिक बांधकाम विभागाचाही आशीर्वाद असल्याने सुरुवातीपासूनच मनमर्जी कामकाज सुरू केले आहे. परंतु या सदोष बांधकामासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी तक्रार केल्यानंतर चौकशीअंती या तीन किलोमीटर रस्त्यातील सळाखीच गायब केल्याचे निदर्शनास आले. परिणामी रस्ताही फोडून दुरुस्त करण्याची नामुष्की ओढवली. आता तर या रस्त्याच्या बाजूला गट्टू (पेव्हिंग ब्लॉक) लावताना खाली सिमेेंट काँक्रिट टाकणे आवश्यक होते. परंतु कंत्राटदाराने सिमेंट काँक्रिट न टाकता चक्क चुरीवरच गट्टू लावयला सुरुवात केली आहे. त्यामुळे ‘कंत्राटदाराने सळाखीनंतर आता सिमेंट काँक्रिटही गिळलं’ तरी सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देईना! असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

आम्ही नाही सुधारणार, जसं काम चाललंय चालू द्या!

वीस कोटींचा खर्च करून बांधलेल्या सिमेंट रस्त्यातील सळाखी गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर या रस्त्याचे फोडकाम करून नव्याने रस्ता तयार करण्यात आला. याचा सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. यापासून बोध घेऊन कंत्राटदारामध्ये सुधारणा होईल आणि सार्वजनिक बांधकाम विभागही विशेष लक्ष देईल, अशी अपेक्षा होती. परंतु ना कंत्राटदाराच्या कामामध्ये सुधारणा झाली ना सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष ठेवले. ‘आम्ही नाही सुधारणार, जसं चाललंय तसं चालू द्या!’ अशीच भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

लावल्याबरोबरच फुटताहेत गट्टू

कारला चौक ते जुनापाणी चौकापर्यंतच्या सिमेेंट रस्त्याच्या बाजूला सिमेंटचे गट्टू लावण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या बाजूलाही कधी काळी जड वाहने उभी केली जात असल्याने गट्टू दबू नयेत किंवा फुटू नये याकरिता गट्टूच्या खाली मजबुतीकरण यावे म्हणून सिमेंट काँक्रीट टाकले जाते. पण, या कंत्राटदाराने चक्क चुरीवरच गट्टू बसविण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी गट्टू दबले असून काही फुटलेही आहेत. विशेषत: या गट्टूही गुणवत्ताहीन असल्याची ओरड होत आहे. याकडे बांधकाम विभागाला लक्ष देण्यास वेळ नसून वरिष्ठांनी याची दखल घेण्याची गरज आहे.

कंत्राटदाराच्या नुकसानीची अधिकाऱ्यांना चिंता?

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना पाणी चौकापर्यंतच्या सिमेंटीकरण आणि चौपदरीकरणाच्या कामामध्ये सुरुवातीपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कंत्राटदाराची चिंता राहिल्याचे दिसून आले आहे. अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच सहजरीत्या कोट्यवधींच्या सळाखी गायब केल्या. परंतु चौकशीअंती हा प्रकार चव्हाट्यावर आल्याने रस्त्याचे खोदकाम करुन पुन्हा रस्ता तयार करावा लागला. यामध्ये कंत्राटदाराचे नुकसान झाले म्हणून आता गट्टूच्या कामातून त्याची भरपाई निघावी म्हणून तर अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत नाही ना? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: a contractor theft cement concrete after the iron rods; slap in the face of PWD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.