शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याचा वाघाने घेतला घास! मृतदेह नेला २०० मीटर फरफटत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 12:22 PM2023-09-06T12:22:49+5:302023-09-06T12:24:44+5:30
ताडगाव परिसरातील घटना
समुद्रपूर/गिरड : वेट, वॉच ॲण्ड अटॅक करून पट्टेदार वाघाने एका शेतकऱ्याला गतप्राण केले. ही घटना मंगळवारी (दि. ५) सकाळी ११ वाजताच्या सुमारास समुद्रपूर तालुक्यातील ताडगाव शेत शिवारात घडली. गोविंदा लहानू चौधरी (६१) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयाला वनविभागाच्या वतीने दहा लाखांची तातडीची शासकीय मदत देण्यात आली आहे.
ताडगाव येथील शेतकरी गोविंदा चौधरी हे नेहमीप्रमाणे बैल घेऊन शेतात गेले होते. दरम्यान, झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने गोविंदा याच्यावर हल्ला चढवत त्याला ठार केले. शिवाय गोविंदाचा मृतदेह २०० मीटर ओढत नेला. ही बाब परिसरातील काही शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अशातच पट्टेदार वाघाने घटनास्थळावरून धूम ठोकली.
गोविंदा याला वाघाने गतप्राण केल्याचे लक्षात येताच वनविभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक अमरजीत पवार, समुद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे, गिरडचे ठाणेदार सुनील दहिभाते यांनी आपल्या चमूसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचलेल्या संबंधित अधिकाऱ्यांसह मंगरूळचे सरपंच विनायक श्रीरामे, क्षेत्रसहायक गोपाल येटरे आदींनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी समुद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. वाघाने शेतकऱ्याला गतप्राण केल्याची माहिती मिळताच माजी आमदार राजू तिमांडे यांनी ताडगाव गाठून मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
वनविभागाने दिली दहा लाखांची तातडीची मदत
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकरी गोविंदा चौधरी याच्या कुटुंबीयांना वनविभागाने तातडीची शासकीय मदत म्हणून दहा लाखांचा धनादेश वितरित केला आहे. हा शासकीय मदतीचा धनादेश सहायक वनसंरक्षक अमरजीत पवार, समुद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे.
आवश्यक ठिकाणी बसविलेय ट्रॅप कॅमेरे
शेतकऱ्यावर हल्ला करणारा वाघ नेमका कुठला याची इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी तसेच वाघाच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाच्या वतीने ताडगाव परिसरात आवश्यक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. शिवाय वनविभागाच्या दोन चमू वाघाच्या मागावर रवाना झाल्या आहेत.
वनविभागाचा नागरिकांना दक्षतेचा इशारा
समुद्रपूर तालुक्यातील ताडगाव परिसरात पट्टेदार वाघाने शेतकऱ्याला ठार केल्याने ताडगावसह परिसरातील दहा गावांना वनविभागाच्या वतीने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर काही मार्गदर्शक सूचना वनविभागाने ग्रामस्थांना दिल्या आहेत. नागरिकांनीही या सूचनांचे काटेकाेरपणे पालन करणे गरजेचे आहे.