बारावीच्या पेपर दिवशीच कॅनालमध्ये बुडून बापलेकाचा मृत्यू, विरूळ परिसरतील घटना
By रवींद्र चांदेकर | Published: February 29, 2024 11:51 AM2024-02-29T11:51:49+5:302024-02-29T11:52:00+5:30
परिसरातील सालफळ येथील कॅनालमध्ये बुडून बापलेकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. अरविंद चेतन कोहळे (वय ५५) आणि चेतन अरविंद कोहळे (१८) अशी मृत बापलेकांची नावे आहे.
विरूळ आकाजी (वर्धा) : परिसरातील सालफळ येथील कॅनालमध्ये बुडून बापलेकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. अरविंद चेतन कोहळे (वय ५५) आणि चेतन अरविंद कोहळे (१८) अशी मृत बापलेकांची नावे आहे. हे दोघे बापलेक बुधवारी कॅनालजवळील शेतात ओलित करीत होते. ओलीत संपल्यावर मुलगा चेतन हा पाय धुण्यासाठी कॅनालवर गेला व पाय घसरून कॅनालमध्ये पडला. त्याला वाचविण्यासाठी वडील अरविंद कोहळे हे गेले असता दोघही बापलेक पाण्यात बुडाले.
या घटनेत दोघाही बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत बापलेक घरी न आल्याने गावातील पन्नास ते साठ लोक शेताच्या रस्त्याने निघाले होते. त्यांना बैल एकटेच येताना दिसले. नंतर शेताजवळ जाऊन पाहता तर त्या दोघांच्याही चपला कॅनलजवळ दिसल्या. गावकऱ्यांना माहिती होताच घटनास्थळावर गावकऱ्यांनी धाव घेतल. दोघाही बापलेकाचा शोध सुरू झाला. रात्री ११:०० वाजता वडीलांचा मृतदेह सापडला, तर गुरुवारी पहाटे ६:०० वाजताच्या सुमारास मुलगा चेतन याचा मृतदेह सापडला.
याबात पुलगाव पोलिस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी दोन्ही मृतदेह पुलगाव येथे सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेले. यात चेतनचा गुरुवारी बारावीचा पेपर होता. या दुर्देवी घटनेने विरूळ परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे. पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे.