मध्यरात्री गोठ्याला भीषण आग; एका बैलाचा भाजून मृत्यू, मुरादपूर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 05:55 PM2022-02-21T17:55:27+5:302022-02-21T18:03:38+5:30

या घटनेत एका बैलाचा जळून मृत्यू झाला, तर तीन जनावरे गंभीर जखमी झाल्याने पशुपालक रमेश हिवसे यांचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

A fierce fire in the cowshed, bull dies and three animals injured | मध्यरात्री गोठ्याला भीषण आग; एका बैलाचा भाजून मृत्यू, मुरादपूर येथील घटना

मध्यरात्री गोठ्याला भीषण आग; एका बैलाचा भाजून मृत्यू, मुरादपूर येथील घटना

googlenewsNext
ठळक मुद्देपशुपालकाचे मोठे नुकसानतीन जनावरे गंभीर जखमी

समुद्रपूर (वर्धा) : नजीकच्या मुरादपूर येथे गोठ्याला अचानक आग लागली. यात एका बैलाचा भाजून मृत्यू झाला, तर तीन जनावरे गंभीर जखमी झाली. ही घटना मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली असून यात पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

गावाशेजारी असलेल्या रमेश हिवसे यांच्या मालकीच्या गोठ्यातील जनावरे मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास ओरडत असल्याचे लक्षात आल्याने परिसरातील नागरिक जागे झाले. काही नागरिकांनी घराबाहेर येत पाहणी केली असता गोठ्याला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण करीत गोठ्यातील साहित्याला आपल्या कवेत घेतले.

दरम्यान, काही नागरिकांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड तासांच्या प्रयत्नाअंती परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात नागरिकांना यश आले असले तरी या घटनेत एका बैलाचा जळून मृत्यू झाला, तर तीन जनावरे गंभीर जखमी झाल्याने पशुपालक रमेश हिवसे यांचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

आगीचे कारण शॉर्टसर्किट?

गोठ्यातील बल्बच्या वॉयरमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

विविध साहित्याचाही झाला कोळसा

अचानक लागलेल्या आगीत गोठ्यात ठेवून असलेले ऑइल इंजिन, ओलितासाठी वापरण्यात येणारे २० पाइप, शेतीविषयक विविध अवजारे जळून कोळसा झाली. आग इतकी भीषण होती की तब्बल दीड तासांच्या प्रयत्नाअंती परिसरातील नागरिकांना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

अन् अधिकाऱ्यांनी गाठले घटनास्थळ

आगीची माहिती मिळताच महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांसह तलाठी दाते, समुद्रपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राम खोत, महावितरणचे अभियंता होले आदींनी सोमवारी सकाळी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुडे यांनी मृत जनावराचे शवविच्छेदन केले.

नुकसानग्रस्ताला शासकीय मदतीची अपेक्षा

अचानक लागलेल्या आगीमुळे पशुपालक रमेश हिवसे यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.

Web Title: A fierce fire in the cowshed, bull dies and three animals injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.