ठंडा है पर गंदा है; पाच रुपयांची पाणी बाटली २० रुपयांमध्ये! विनापरवानगी सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 05:03 PM2022-05-06T17:03:28+5:302022-05-06T17:52:08+5:30

बोरमधील पाणी केवळ थंड करून विकले जात आहे. ते पाणी आरोग्यास खूप घातक आहे का, याची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, हे तपासण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

A five rupee bottle sells for 20 rupees; Unauthorized sale in Wardha | ठंडा है पर गंदा है; पाच रुपयांची पाणी बाटली २० रुपयांमध्ये! विनापरवानगी सर्रास विक्री

ठंडा है पर गंदा है; पाच रुपयांची पाणी बाटली २० रुपयांमध्ये! विनापरवानगी सर्रास विक्री

Next
ठळक मुद्देवर्ध्यात अनेक कंपन्यांचा गोरखधंदा

वर्धा : शहरात जीवन प्राधिकरणमार्फत पाणीपुरवठा होत आहे. सध्या पिण्याचे पाणी विकत घेण्याचे ‘फॅड’ वाढले. मात्र, विकत घेऊन मिळणारे पाणी कितपत शुद्ध, याबाबत नागरिक अनभिज्ञ असल्याने मिनरल वॉटरच्या नावाखाली जारमधून अशुद्ध पाणी विक्रीचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. परिणामी नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. पाच रुपयांमध्ये विकली जाणारी बाटली २० ते २५ रुपयांना विक्री होत असलेले हे पाणी ठंडा है पर गंदा है, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

विविध सण, उत्सव, लग्न, पार्ट्या तसेच हॉटेल, शासकीय कार्यालये, खासगी कंपन्यांमध्ये २० लिटर जारच्या पाण्याला मागणी वाढल्याने विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहे. मात्र, सध्या कमी भांडवल व कमी जागेत जास्त नफा कमावून देणारा व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जात आहे. बाटली बंद तसेच कॅनचे पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक असतो. तथापि, परवाना न काढताच काही उद्योजक निर्मिती करतात. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागही दुर्लक्ष करतात. यातून ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बोरमधील पाणी केवळ थंड करून विकले जात आहे. ते पाणी आरोग्यास खूप घातक आहे का, याची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, हे तपासण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

पाणी नमुनेही तपासले जातात

अन्न व औषध प्रशासनाकडून केवळ बाटलीबंद पाण्याचे नमुने तपासले जातात. वर्षभरात अनेक बाटलीबंद पाण्याचे नमुने तपासल्याची माहिती आहे. मात्र, जार आणि कॅनमधील पाणी तपासण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला नाही, हे विशेष.

मनुष्यबळही कमी पण, काम व्यवस्थित

अन्न व औषध प्रशासन विभागात काही जागा रिक्त आहेत. पण, त्या येत्या काळात भरून निघतील. मात्र, यामुळे कामात कुठलाही अडथळा येत नसून कामे अगदी सुरळीत होत असल्याची माहिती आहे.

विनापरवानगी प्लांट अन् पाण्याची विक्री

शहरात अनेक ठिकाणी विनापरवाना प्लान्ट आणि पाण्याची विक्री होत असून याकडेही लक्ष देण्याची नितांत गरज आहे. दोन वर्षांपूर्वी देखील हा मुद्दा उपस्थित झाला असता खासदारांनी स्वत: मध्यस्थी करून प्रकरण मिटविले. मात्र, आजघडीला हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

विक्रेत्यांवर बंधन नाही

अनेक ठिकाणी विनापरवानगी पाण्याची विक्री होत असून या पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. अनेकदा बोअरमधून किंवा विहिरीतून पाण्याचा उपसा करून ते पाणी थंड करून विक्री केली जाते.

चांगले बाटलीबंद पाणी कसे ओळखायचे?

अन्न व औषध प्रशासनाला केवळ पॅकेज ड्रिकिंग वॉटरची तपासणी करण्याचे अधिकार आहेत. त्या अनुषंगाने ज्या बाटलीवर आयएसआय किंवा व्हीआयएसचे चिन्ह तसेच त्याचे सील बरोबर असेल असेच पाणी शुद्ध असल्याचे समजावे. आयएसआयचे नाव आता व्हीआयएस असे झाले आहे.

पॅकेज ड्रिंकींग वॉटरची बाटली शुद्ध आहे की नाही, याची तपासणी अन्न व औषध विभागाकडून केली जाते. पाण्याचे नमुनेही घेतले जातात. पण, भूगर्भातून पाण्याचा उपसा होत असेल तर खनिकर्म विभागाकडून तपासणी आवश्यक असते. आमच्या विभागाकडून कारवाई केली जाते.

- जयंत वाणे, सहायक आयुक्त अन्न व औषध विभाग

Web Title: A five rupee bottle sells for 20 rupees; Unauthorized sale in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.