विद्रोही साहित्य संमेलनासाठी एक मूठ धान्य, एक रुपया दान मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 04:37 PM2023-01-11T16:37:35+5:302023-01-11T16:41:10+5:30
वर्ध्यातून केली सुरुवात : संमेलन ४ व ५ फेब्रुवारीला
वर्धा : ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची घोषणा झाल्यानंतर १७ वे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनही नियोजित करण्यात आले आहे. ४ व ५ फेब्रुवारीला हे विद्रोही साहित्य संमेलन होणार असल्याने या संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्यप्रेमींना भोजन व साहित्यनगरी निर्माण करण्यासाठी, अनुषंगिक सुविधांसाठी धान्य आणि पैशाची गरज आहे. यासाठी आयोजकांनी ‘एक मूठ धान्य व एक रुपया सम्यक दान मोहीम’ सुरू केली आहे. आर्वी नाका परिसरातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.
सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सम्यकदानाचा अर्थ समजावून सांगितला आहे. देणाऱ्याला अहंकार वाटता कामा नये व घेणाऱ्याला न्यूनगंड वाटता कामा नये, या संकल्पनेवर आधारित निधी गोळा करता आला पाहिजे, अशी भूमिका १७ व्या साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे यांनी मांडली. तसेच जनतेच्या क्रांतिकारी पर्यायी साहित्य-संस्कृतीच्या जागरात सर्वांनी तन-मन-धनाने मदत करून सर्व बहुजन, आदिवासी, भटके, महिला, शोषित, वंचित, पीडित व सर्वहारा घटकांचे हे संमेलन यशस्वी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
संमेलनाला मिळणारा शासकीय निधी बंद करावा - नीतेश कराळे
सरकारी पैसा साहित्य संमेलनावर खर्च न करता विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी व कामगार आदींसाठी खर्च करावा. शासनाकडून मिळणारा निधी बंद करून थेट विद्रोही साहित्य चळवळीसारखे जनतेत जाऊन मदत मागावी. साधे जेवण आणि समतावादी साहित्य व मूल्य संस्कृतीचा जागर आणि विचारांची मेजवानी हे विद्रोहीचे वैशिष्ट्य आहे. त्यासाठी एक मूठ धान्य व एक रुपया सम्यक दान करावे, असे मत अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतेश कराळे यांनी मांडले.
नुसता कल्ला म्हणजे विद्रोह नव्हे : चंद्रकांत वानखडे
वर्धा येथे ४ व ५ फेब्रुवारी रोजी अ. भा. विद्रोही साहित्य संमेलन होऊ घातले आहे. विद्रोही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून नुसता कल्ला झाला म्हणजे विद्रोह होय, हा विचार मला मान्य नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांच्यासह गांधीही विद्रोहाचे प्रतिक आहे, ही भूमिकाच आपण स्वीकारली असून, याच भूमिकेतून साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मी विचार व्यक्त करणार आहोत. विद्रोहीवाद्यांना गांधी तसा मान्य होत नाही. मात्र, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. जमिनीच्या पोटातून उगविणारा अंकुर जसा परिश्रमाने वर येतो, त्याचे हे परिश्रमही मी विद्रोह मानतो. त्यामुळे विद्रोही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर यावेळी गांधीही असतील, अशी भूमिका विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ संपादक चंद्रकांत वानखडे यांनी व्यक्त केली. संमेलनापूर्वी त्यांनी सोमवारी वर्धा येथील ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली, यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ लेखक संतोष अरसोड हेही उपस्थित होते.