मोबाईलवर बोलताना मजुरास उच्चदाब वाहिनीचा स्पर्श, गंभीर दुखापत
By चैतन्य जोशी | Published: April 19, 2023 04:24 PM2023-04-19T16:24:35+5:302023-04-19T16:25:00+5:30
जखमीवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार : सुकळी गावातील घटनेने खळबळ
वर्धा : मोबाईल फोनवर बोलत बोलत घराच्या छतावर गेलेल्या मजुराला छतावरुन गेलेल्या उच्चदाब वाहिनीचा स्पर्श झाल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना सेलू तालुक्यातील सुकळी परिसरात १९ रोजी सकाळी ९.३० ते १० वाजताच्या सुमारास घडली.
जखमी मजुरावर सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पंकज ब्रिजलाल पंधराम (२२) रा. सावली टोला ता. कुरई जि. शिवणी असे जखमी मजुराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सेलू तालुक्यातील सुकळी नजीक असलेल्या आरामशीन परिसरात मध्यप्रदेशातून काही मजूर लाकूड कटाईच्या कामानिमित्त वास्तव्यास आले आहेत. सहा मजूर सकाळीच घोराड येथे कामानिमित्त निघून गेले होते. तर पंकज आणि त्याच्या सोबत आणखी एक मजूर हे दोघे आरामशीन परिसरातच थांबले होते. पंकजला कुणाचातरी फोन आल्याने तो मोबाईलवर बोलत बोलत छातावर गेला. मोबाईलवरुन बोलत असतानाच छतावरुन गेलेल्या उच्चदाब वाहिनीच्या प्रवाहित वीजतारांना त्याचा स्पर्श झाल्याने तो छतावरुन खाली जमिनीवर पडला.
या दुर्घटनेत पंकजच्या हातांच्या बोटांना, चेहऱ्याला तसेच पायांच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी पंकजला सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात नेले तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास सेवाग्राम येथील रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे