माकडाची शिकार करण्याच्या नादात बिबट्याचा गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 10:56 AM2023-06-21T10:56:26+5:302023-06-21T10:57:29+5:30
झाडाची फांदी तुटल्याने पडला जमिनीवर
कारंजा (घा.)/वर्धा : माकडाची शिकार करण्यासाठी झाडावर चढलेल्या बिबट्याचा जमिनीवर पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली.
कारंजा तालुक्यातील धामकुंड जंगल शिवारात वनकर्मचारी गस्तीवर असताना, एका झाडाखाली बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर, वनकर्मचाऱ्याचे घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच, वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर, घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता, एका झाडाची फांदी तुटलेली दिसून आली. मृत बिबट माकडाची शिकार करण्याच्या बेतात असताना झाडावर चढला. अशातच झाडाची फांदी तुटल्याने तो जमिनीवर पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होत बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे.
मृत बिबट सुमारे तीन वर्षांचा
मृत मादी बिबट सुमारे तीन वर्षे वयोगटांतील असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेत, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बिबट्याच्या उत्तरीय तपासणीसाठी पाचारण केले. डॉ.सुरेश मांजरे, डॉ.सुरेंद्र पराते, डॉ.राजेंद्र घुमडे यांनी उत्तरीय तपासणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यावर उपवनसंरक्षक राकेश शेपट, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र सावंत, क्षेत्र सहायक एस.एस. पठाण, एम.एस ठोंबरे, वनपाल चंद्रमणी रंगारी, पुरुषोत्तम काळसाईत आदींच्या उपस्थितीत मृत बिबट्याच्या मृतदेहाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.