वर्ध्यात शेत शिवारात एन्ट्री केलेल्या बिबट्याने घेतला अखेरचा श्वास
By महेश सायखेडे | Published: August 6, 2023 04:47 PM2023-08-06T16:47:04+5:302023-08-06T16:50:41+5:30
बिबट्याने नागरिकांच्या समक्षच अखेरचा श्वास घेतल्याने वनविभागाचे टेन्शन वाढले आहे.
वर्धा : आर्वी तालुक्यातील खरांगणा (मो.) नजीकच्या दिघी मौज्यातील पानवाडी शेत शिवारात कपाशीच्या पिकात सुमारे अडीच वर्षीय नर बिबट्याचा मृतदेह सापडल्याची घटना ताजी असतानाच रविवारी नटाळा शेत शिवारात एन्ट्री केलेल्या सुमारे एक वर्ष वयोगटातील मादी बिबट्याने नागरिकांच्या समक्षच अखेरचा श्वास घेतल्याने वनविभागाचे टेन्शन वाढले आहे. या दोन्ही बिबट्यांच्या मृत्यूचे ठोस कारण अद्यापही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गवसले नसले तरी नागरिकांकडून अनेक तर्क लावले जात आहेत.
खरांगणा (मो.) पासून जवळच असलेल्या नटाळा शेत शिवारात दुर्योधन देशभ्रतार यांच्या शेतात बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याचे लक्षात येताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच खरांगणा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी काही वन्यजीव प्रेमींना सोबत घेत घटनास्थळ गाठले. बारकाईने पाहणी केली असता संबंधित बिबट्या खेकारत असल्याचे आणि त्याची प्रकृती अस्वस्त असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना लक्षात आले. लागलीत बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू चमूही घटनास्थळी दाखल झाली. प्रकृती अस्वस्त असलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत असतानाच संबंधित मादी बिबट्याने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर बिबट्याचा मृतदेह खरांगणा येथील वनविभागाच्या रोपवाटीकेत नेत उत्तरिय तपासणी करण्यात आली. संबंधित बिबट्याला टिक फिव्हर किंवा विषबाधा तर झाली नाही आदी विषयाची अधिकची माहिती मृत मादी बिबट्याच्या शवविच्छेदन अहवालाअंती पुढे येणार आहे.
घटनास्थळी बघ्यांची तोबा गर्दी
शेत शिवारात बिबट्या असल्याची माहिती नटाळा परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांनी गर्दी बाजूला सारून मादी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. अशातच बिबट्याने अखेरचा श्वास घेतला.