दिवसाढवळ्या धान्य व्यापाऱ्याचे घर फोडले; ३१ तोळे सोने, दीड किलो चांदी, ३ लाखांची रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 03:56 PM2023-01-14T15:56:02+5:302023-01-14T15:57:30+5:30
कुलूपबंद घर केले टार्गेट
कारंजा (घाडगे) : येथील धान्य व्यापाऱ्याचा परिवार खासगी रुग्णालयात उपचाराकरिता बाहेरगावी गेल्यामुळे घर कुलूप बंद होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरात प्रवेश करुन ३१ तोळे सोने, दीड किलो चांदी आणि जवळपास ३ लाख रुपये रोख लंपास केले. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली असून या चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
अशोक अग्रवाल या धान्य व्यावसायिकाचे शहरात घर आहे. अशोक अग्रवाल सकाळी १० वाजता घराला कुलूप लावून दुकानात निघून गेले. तसेच त्यांच्या परिवारातील सदस्य नागपूरला खासगी रुग्णालयात नियमित उपचाराकरिता गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप लावलेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील सोन्याचांदीसह रोख रक्कमेवर हात साफ केला. अशोक अग्रवाल हे सायंकाळी ५ वाजता घराकडे जाण्यासाठी निघाले असता त्यांना अनोळखी व्यक्तीने रस्त्यात अडवून विचारपूस केली. काही वेळ येथे गेल्यानंतर ते घरी पोहोचले. कुलूप उघडून घरामध्ये शिरले असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडून दिसले. त्यामुळे चोरीचा संशय आल्याने त्यांनी बाहेरगावी गेलेल्या पत्नीला फोन करून बोलावून घेतले.
पाहणी केली असता घरातील काचेच्या शोकेसमधील टेडी खाली पडला होता. त्यातील सोनं चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. तसेच बेडरूमधील लाखडी कपाटाखाली ठेवलेले सोन्या-चांदीचेही दागिने चोरून नेले. या घरातून चोरट्यांनी ३१ तोळे सोने, दीड किलो चांदी आणि जवळपास तीन लाख रुपये रोख असा एकूण १४ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, प्रभारी पोलिस निरीक्षक भानुदास पिदूरकर, उपनिरीक्षक सचिन मानकर, उपनिरीक्षक केकन, सहायक उपनिरीक्षक लीलाधर उकंडे, प्रवीण चोरे, उमेश खामनकर, गुड्डू थुल, नितेश वैद्य, किशोर कापडे, कोमल वानखडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक दाखल झाले. त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
चोरीच्या घटनेने पोलिस बुचकळ्यात
धान्य व्यापारी अशोक अग्रवाल यांचे घर कुलूपबंद होते. घराचे कुलूप चावीने उघडून अज्ञात चोरटा घरात शिरला आणि घरातील सोनेचांदी व रोख घेऊन निघून गेला. त्यामुळे चोरट्याकडे कुलपाची चावी आली कुठून असा प्रश्न पोलिसांना पडला. घरातील सोन्याचीही कोणालाही माहिती नसताना त्याच ठिकाणाहून ऐवज लंपास करण्यात आला. या घरात चार जण राहतात, त्यातील दोघांनाच याची माहिती आहे. त्यामुळे चोरट्यांकडे ही माहिती गेली कशी? त्यामुळे चोर कोण असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.