'शिवम'चा मारेकरी त्याच्याच गावचा, अल्पवयीन बालकाला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 10:39 AM2023-09-04T10:39:04+5:302023-09-04T10:41:09+5:30
नारा आश्रमशाळेतील प्रकरण : गादीच्या ढिगाऱ्याखाली आढळला होता मृतदेह
वर्धा : कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील स्व. यादवराव केचे आश्रमशाळेत शिवम उईके (१३) विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेतील गादीच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला होता. या घटनेचा पोलिसांनी कसून तपास केला असता त्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याचे उघड झाले आहे.
मारेकरी मृतक शिवम उईके याच्या डोमा ता. चिखलदरा जिल्हा अमरावती या गावचा असून त्याचे वय १५ वर्ष आहे. तो नारा येथे याच शाळेत नवव्या वर्गात शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवम व त्याचा मित्र शाळेच्या आवारातील वसतिगृहात एकत्रच राहत होते. कपडे पेटीत ठेवण्याच्या करणातून दोघात वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. त्यात अल्पवयीन आरोपीने मृताला धक्काबुकी केली व जमिनीवर आपटले. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली व तो जागीच ठार झाला.
ही घटना कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून शाळेतील गादीच्या ढिगाऱ्यात त्याचा मृतदेह लपवून ठेवला. मुले जेव्हा रात्री झोपण्यासाठी गाद्या काढायला गेली तेव्हा घटना उघडकीस आली. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा कारंजा पोलिस ठाण्याला नोंद करण्यात आला आहे. अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. रविवारी बाल न्यायालय वर्धा येथे हजर केले. पुढील तपास ठाणेदार सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि कुटेमाटे करत आहे.