अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावासासह दंड; वर्धा जिल्हा न्यायालयाचा निकाल
By महेश सायखेडे | Published: April 21, 2023 06:34 PM2023-04-21T18:34:50+5:302023-04-21T18:35:20+5:30
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षांच्या सश्रम कारावासासह दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षांच्या सश्रम कारावासासह दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा निकाल वर्धा येथील जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश एन. बी. शिंदे यांनी दिला. सुजीत ललीत सोनी रा. कारंजा (घा.) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.
सुजीत सोनी याला भादंविच्या कलम ३५४, ३५४ अ (१) तसेच पोक्सोच्या सहकलम ८ अन्वये दोषी ठरवून तीन वर्षाचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पीडिता ही बाथरुममध्ये गेली असता आरोपीने तेथे येत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेण्यात आल्यावर संबंधित प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कविता फुसे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. शासकीय बाजू ॲड. प्रसाद प. सोईतकर यांनी पाहिले. तर पैरवी अधिकारी म्हणून ए. जे. सोनटक्के यांनी काम पाहिले. या प्रकरणी एकूण पाच साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश एन. बी. शिंदे यांनी आरोपीस दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.