कर्तव्य बजावून घरी निघालेल्या पोलिसाचा दुचाकी अपघातात मृत्यू
By चैतन्य जोशी | Published: October 11, 2023 02:39 PM2023-10-11T14:39:42+5:302023-10-11T14:44:35+5:30
सोनेगाव येथील घटना : पोलिस दलात शोकाकुल वातावरण
वडनेर : कर्तव्य बजावून घरी जात असलेल्या पोलिस अंमलदाराचा दुचाकी अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. हा अपघात सोनेगाव परिसरात असलेल्या मेवात धाब्यासमोरील रस्त्यावर १० रोजी रात्री ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास झाला. अमित नाईक (४२ रा. हिंगणघाट) असे मृतक पोलिस अंमलदाराचे नाव आहे.
अमित नाईक हे वडनेर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. १० रोजी रात्री ते कर्तव्य पार पाडून हिंगणघाट येथे दुचाकीने त्यांच्या घरी जात असताना सोनेगाव परिसरात असलेल्या मेवात ढाब्यासमोरील रस्त्यावर अचानक दुचाकी अनियंत्रीत होऊन अपघात झाला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ डायल ११२ वर संपर्क केला असता वडनेर पोलिस ठाण्याचे कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. अमित नाईक यांना तत्काळ हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता प्राथमिक उपचारानंतर त्यांना लगेच नागपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिस अंमलदार अमित नाईक यांच्या अपघाती मृत्यूने पोलिस विभाग शोकमग्न झाले आहे.
अमित नाईक होते उत्कृष्ट कबड्डीपटू
मृतक अमित नाईक हे हिंगणघाट येथील मातृभूमी यादगार क्रीडा मंडळाचे उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून परिचित होते. त्यांच्या अपघाती मृत्यूची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच क्रिडा प्रेमींना जबर धक्का बसला असून कुटुंबात शोककळा पसरली आहे.