वर्ध्यातील 'धाम'च्या जल साक्षीने होणार ७५ नद्यांची परिक्रमा; राज्यातील ११० स्वयंसेवक घेणार प्रशिक्षण
By महेश सायखेडे | Published: September 30, 2022 04:30 PM2022-09-30T16:30:35+5:302022-09-30T16:32:58+5:30
नद्यांना अमृत वाहिन्या बनविण्याचा मानस
वर्धा : 'चला जाणूया नदीला' हे घोष वाक्य केंद्रस्थानी ठेऊन राज्यातील तब्बल ७५ नद्यांना अमृत वाहिन्या बनविण्याचा मानस उराशी बाळगून नद्यांच्या परिक्रमेचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ही नदी परिक्रमा महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्ध्यातील धाम नदीच्या निर्मल जलाच्या साक्षीने होणार असून त्याचा शुभारंभ गांधी जयंतीचे औचित्य साधून होणार आहे.
महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा व पश्चिम वाहिन्यांच्या खोऱ्यातील ७५ नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी राज्यातील तब्बल ११० स्वयंसेविकांना सेवाग्राम येथे १ ते ३ ऑक्टोंबर या काळात विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून हेच स्वयंसेवक वर्धा येथील धामच्या जलाचा कलश आपआपल्या भागात नेणार आहेत. सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून तो राज्य शासनाला सादर होणार आहे. त्यानंतर लोकसहभागातून नद्यांना अविरल व निर्मल करण्यासाठी विशेष प्रयत्न होणार आहेत.
डॉ. राजेंद्र सिंह अन् चिन्मय उदगीरकर करणार मार्गदर्शन
संपूर्ण राज्यातील तब्बल ७५ नद्या निर्मल करण्यासाठी ११० स्वयंसेवकांचे (जलनायक) विशेष प्रशिक्षण वर्धा जिल्ह्यात होणार आहे. या प्रशिक्षणात आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह आणि जलबिरादरीचे ब्रँड ॲम्बेसिडर अभिनेता चिन्मय उदगीरकर हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
तयार होणार सूक्ष्म आराखडा
प्रशिक्षण घेतलेले ११० जलनायक गोदावरी, तापी, नर्मदा, कृष्णा व पश्चिम वाहिन्यांच्या खोऱ्यातील ७५ नद्यांची सध्यास्थितीची माहिती गोळा करून या नद्या निर्मल कशा होईल या दृष्टीने सूक्ष्म आराखडा तयार करून तो महाराष्ट्र शासनाला सादर करणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून हिरवी झेंडी मिळताच या ७५ नद्या निर्मळ करण्यासाठी लोक सहभागातून मोठी चळवळ उभी करून प्रत्यक्ष काम केले जाणार आहे. विशेष म्हणजे भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून १५ ऑक्टोंबर ते २६ जानेवारी २०२३ या काळात नदी यात्रा हा उपक्रम राबविला जाणार आहे.