भदाडी नदीच्या पुलावर 'बर्निंग कार'चा थरार; चालकाच्या समयसुचकतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 04:57 PM2022-03-17T16:57:57+5:302022-03-17T18:04:44+5:30
दुधे कुटुंबिय होळी सणानिमित्त मुलीला गाठी-चोळी देण्यासाठी म्हणून चारचाकी वाहनाने वर्धेला जात होते. दरम्यान, सेलसुरा नदीच्या अपघातग्रस्त पुलावर या गाडीच्या सामोरील भागाने अचानक पेट घेतला.
देवळी (वर्धा) : महिनाभरात दहा जणांचे जीव घेणाऱ्या सेलसुरा नदीच्या पुलावर भरधाव असलेल्या रोनाल्ड स्काला या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. पाहता-पाहता ही गाडी धु-धु पेटून भस्मसात झाली. या घटनेत गाडी चालकाची समयसुचकता कामी आल्याने जीवितहानी टळली. गुरुवारच्या दुपारच्या सुमारास ही घटना ही घडली.
प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी यवतमाळकडून येणारी रोनाल्ड स्काला गाडी (एमएच २९ बी सी ४२५६ ) प्रवासी घेऊन वर्धेकडे भरधाव जात होती. या गाडीत चालक सुनील भगत प्रवासी प्रणय दुधे, जयंत दुधे, विक्की गायकवाड, संजुमाला दुधे, सतीका दुधे (सर्व राहणार यवतमाळ) हे सर्व होळी सणानिमित्त मुलीला गाठी-चोळी देण्यासाठी म्हणून वर्धेला जात होते. दरम्यान सेलसुरा नदीच्या अपघातग्रस्त पुलावर या गाडीच्या सामोरील भागाने अचानक पेट घेतला. वाहनचालकाने कोणतीही वेळ न दवडता गाडी थांबविली व गाडीतील लोकांना भराभर बाहेर काढले. आगीने पाहता-पाहता संपूर्ण गाडीला घेरले.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन देवळीच्या अग्निशामक दलाल पाचारण करून लागलेली आग अवाक्यात आणण्यात आली. तोपर्यंत संपूर्ण गाडी जळून भस्मसात झाली. परंतु यावेळी आग विझविण्याच्या घाईगर्दीत पुन्हा दुसरी घटना घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी पोहचताच या गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिंद्रा कंपनीच्या चारचाकी वाहनाला धडक दिली. यात या वाहनाचे बरेच नुकसान झाले. सावंगी पोलिसांनी या दोन्ही घटनांचा पंचनामा केला. चालकाच्या सावधानतेमुळे मोठी घटना टळली. मात्र, वारंवार या पुलाच्या आजूबाजूला होणाऱ्या अपघाताच्या घटना चर्चेचा विषय ठरल्या आहेत.