गर्लफ्रेंड फोन उचलत नव्हती; वाट अडवून तिला निर्जनस्थळी नेले, बळजबरीने औषध पाजले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 01:11 PM2023-01-31T13:11:37+5:302023-01-31T13:17:45+5:30
सदर घटना हिंगणघाट येथे घडली असून, तक्रारीनंतर हा प्रकार उजेडात आला आहे.
हिंगणघाट: प्रेयसी फोन उचलत नाही, बोलत नाही याच गोष्टीचा राग मनात धरून २२ वर्षीय माथेफिरू तरुणाने मैत्रिणीसोबत घराबाहेर पडलेल्या एका १९ वर्षीय तरुणीला वाटेत अडवून थेट दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेले. याच निर्जनस्थळी माथेफिरू तरुणाने तरुणीला बळजबरीने औषध पाजून तिला जिवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना हिंगणघाट येथे घडली असून, तक्रारीनंतर हा प्रकार उजेडात आला आहे.
हिंगणघाट भागातील टिळक वॉर्ड परिसरातील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय पीडितेला हिंगणघाट येथील ज्ञानेश्वर वॉर्ड भागातील रहिवासी असलेल्या अमन अरुण निखार (२२) याचा फोन आला. अमन याने पीडितेस भेटण्यास बोलावले असता पीडितेने त्यास नकार दिला. शिवाय फोन उचलणे बंद केले. दरम्यान, पीडिता ही काही कामानिमित्त मैत्रिणीसोबत हिंगणघाट येथील कलोडे मंगल कार्यालय परिसरात आली असता आरोपी अमन याने तेथे येत पीडितेला जबरी दुचाकीवर बसविले.
आरोपीने पीडितेला दुचाकीने बारामती सिटी टाऊन परिसरातील निर्मनुष्य स्थळी नेत माझ्याशी बोलत का नाहीस या कारणावरून वाद करीत थेट गाडीच्या डिकीत असलेले औषध जबरी पाजून तिला जिवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडितेची तक्रार, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून आरोपी अमन निखार याच्याविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहेत.
वैद्यकीय अहवाल अन् तक्रारीची घेतली दखल
या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी पीडितेची तक्रार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालाची दखल घेत आरोपीवर गुन्हा नोंदविला आहे.