हिंदी विद्यापीठात शिरलेला आजारी बिबट्या सव्वादोन तासांत रेस्क्यू
By महेश सायखेडे | Published: July 19, 2023 08:44 PM2023-07-19T20:44:32+5:302023-07-19T20:50:20+5:30
दोन 'डॉट'मध्ये झाला बेशुद्ध, करुणाश्रमात केले जाताय उपचार
महेश सायखेडे, वर्धा: शहराशेजारील उमरी (मेघे) भागातील महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या परिसरात बुधवारी दुपारी एन्ट्री केलेल्या बिबट्याला शर्तीचे प्रयत्न करून अवघ्या दोन तासांत बेशुद्ध करीत रेस्क्यू करण्यात वनविभागासह पीपल्स फॉर ॲनिमलच्या स्वयंसेविकांना यश आले. रेस्क्यू केलेला नर बिबट्या हा १८ महिने वयोगटातील आहे. संबंधित अशक्त बिबट्यात काविळची लक्षणे आढळल्याने त्याच्या रक्ताचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या बिबट्यावर सध्या पीपल्स फॉर ॲनिमलच्या करुणाश्रमात उपचार सुरू आहेत. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या परिसरात बिबट्या असल्याचे तेथील सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे यांना माहिती दिली. मिरगे यांनी संबंधित माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पीपल्स फॉर ॲनिमलचे आशिष गोस्वामी यांना दिली. त्यानंतर पीपल्स फॉर ॲनिमलचे स्वयंसेवक आणि वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बिबट्याला सुरक्षित रेस्क्यू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. इकडून तिकडे पळणारा बिबट्या हिंदी विद्यापीठाच्या प्रशासकीय भवनाच्या मागील झुडपात लपला. याच संधीचे सोने करीत बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी सुमारे ३० मीटर अंतरावरून नेम लावत दुपारी १:५० वाजताच्या सुमारास फायर करण्यात आला. हा डॉट हुकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याच्या शेपटीच्या शेजारी लागला; पण बिबट्या बेशुद्ध झाला नाही. त्यानंतर शोध व बचाव मोहीम राबविणाऱ्यांनी हार न मानता पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करीत दुपारी २:२५ वाजताच्या सुमारास नेम लावत फायर केला. हा डॉट बिबट्याच्या मागील पायाच्या वरील भागात लागला. त्यानंतर अवघ्या काही क्षणातच बिबट्या बेशुद्ध झाल्याने त्याला सुरक्षित रेस्क्यू करून पीपल्स फॉर ॲनिमलच्या करुणाश्रमात आणण्यात आले.
पंधरा दिवसांपासून होता उमरी परिसरात वावर
बुधवारी सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलेला बिबट्याचा सुमारे पंधरा दिवसांपासून वर्धा शहराशेजारील पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), उमरी (मेघे) भागात वावर होता. पंधरा दिवसांपूर्वी वनविभागाला बिबट्या बाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे दहा ट्रॅप कॅमेरेही आवश्यक ठिकाणी लावण्यात आले होते.
आठ दिवसांपूर्वी श्वानाची केली होती शिकार
माहिती मिळाल्यानंतर बिबट्याचा शोध वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घेत असतानाच आठ दिवसांपूर्वी पिपरी (मेघे) भागातील करुणाश्रम परिसरात बिबट्याने एका श्वानाची शिकार केली; पण बिबट्या वनविभागाला गवसला नव्हता. तर बुधवारी बिबट्याने थेट हिंदी विद्यापीठाच्या परिसरात एन्ट्री केल्याने आणि तो सुरक्षा रक्षकाला दिसल्याने परिसरात एकच तारांबळ उडाली होती.
पशुचिकित्सकांचा रेस्क्यू बिबट्यावर वॉच
सुरक्षित रेस्क्यू केलेल्या बिबट्याला अरुणाश्रमात आणल्यावर पशुचिकित्सक डॉ. संदीप जोगे यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. १०५ अंश एवढे शरीराचे तापमान असलेला बिबट्या तापाने फणफणत असल्याचे लक्षात आल्यावर त्याच्यावर औषधोपचारही करण्यात आले. सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत रेस्क्यू केलेला बिबट्या शुद्धीत येण्याची प्रतीक्षा कायम होती.