वर्धेच्या क्रांतिकारी कृषिपुत्राचा मेक्सिकोत उभारला पुतळा; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2022 12:21 PM2022-09-05T12:21:08+5:302022-09-05T14:28:31+5:30
कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल
वर्धा : वर्धा जिल्ह्याचे सुपुत्र व महान क्रांतिकारी तसेच आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञ डॉ. पांडुरंग खानखोजे यांचा पुतळा मेक्सिको देशातील चापिंगो येथील नॅशनल स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर विद्यापीठात बसविण्यात आला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
खानखोजे यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सिंहाचा वाटा राहिला आहे. गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिकोच्या शेतीतले जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे सारे आयुष्य संघर्षमयी घटनांनी भरलेले आहे.
खानखोजे यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८३ ला वर्धा येथे झाला. त्यानंतर त्यांनी आजोबाकडून स्वातंत्र्यलढ्याचा वारसा घेत वर्धेच्या हनुमान टेकडीवर सवंगड्यांसह क्रांतिकारकांचा अड्डा बनविला. शिवाय 'बाल समाज' स्थापन करून दर रविवारी बालमित्र बैठक घेत. क्रांतिवीर दामोदर चापेकर वर्धेला आले अन् यांच्या 'क्रांती सेना' उभारण्याच्या स्वप्नाला बळ मिळाले. अमेरिकेत असलेल्या भारतीयांशी संपर्क साधून 'आझाद -ए-हिंद’ संस्था स्थापन केली. त्यांच्या कार्यात पंडित काशीराम व सरदार सोहनसिंह यांचे सहकार्य मिळाले.
आझाद-ए-हिंदची सदस्य संख्या ५००० च्या वर पोहोचली. ज्यात शीख समाजाचे लोक जास्त असल्यामुळे डॉ. खानखोजे यांनी इतिहासाचे प्राध्यापक लाला हरदयाल यांना अध्यक्षपद बहाल केले. लाला हरदयाल यांच्या सांगण्यावरून 'आझाद-ए-हिंद'चे नामकरण 'गदर पार्टी' असे करण्यात आले. याचवेळी त्यांनी शेतीशास्त्रात मास्टर ऑफ सायन्सची पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते नॅशनल स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर चापिंगो सिटी मेक्सिको येथे प्रोफेसर म्हणून नोकरीला लागले.
या काळात त्यांनी मका, गहू, डाळ, रबर आदींवर शोधकार्य केले. तसेच सुखा प्रतिरोधी कृषी उत्पादन विकास प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले. मेक्सिको देशातील नागरिकांसाठी फ्री कृषी विद्यालय स्थापन केले. कृषी क्षेत्रातील त्यांच्या अग्रणी कार्याची दखल मेक्सिकोने घेऊन भारताच्या या सुपुत्राचा पुतळा तेथे उभारला आहे.