वर्ध्यातील मराठी साहित्य संमेलनाकरिता ४१ समित्यांची बांधली मोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 08:12 PM2023-01-16T20:12:56+5:302023-01-16T20:16:52+5:30
Wardha News वर्ध्याच्या भूमीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. हे संमेलन ऐतिहासिक ठरावे, याकरिता आयोजकांकडून विविध संघटना व विविध क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून ४१ समित्यांच्या माध्यमातून नियोजनाची तयारी चालविली आहे.
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या वर्ध्याच्या भूमीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. हे संमेलन ऐतिहासिक ठरावे, याकरिता आयोजकांकडून विविध संघटना व विविध क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून ४१ समित्यांच्या माध्यमातून नियोजनाची तयारी चालविली आहे. या समित्या नियमित बैठका घेऊन उत्कृष्ट नियोजन करण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून येत आहे.
वर्ध्यातील स्वावलंबी विद्यालयाच्या प्रांगणात तब्बल ५३ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने ३, ४ आणि ५ फेब्रुवारीला साहित्यिकांचा महाकुंभ मेळा भरणार आहे. त्यासाठी साहित्यनगरी सज्ज होत असून संमेलनाचा मंडप आणि विविध दालने तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. संमेलनासाठी मंडप उभारणीपासून, येणाऱ्यांची निवास व भोजन व्यवस्था, प्रसिद्धी आणि समारोपीय कार्यक्रमापर्यंत प्रत्येक जबाबदारी विविध समित्यांकडे सोपविण्यात आली आहे.
संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता ४१ समित्या गठित करण्यात आल्या आहेत. यामध्ये निधी संकलन समिती, ग्रंथ दिंडी समिती, चित्र-शिल्प-रांगोळी समिती, मंडप-विचारपीठ-प्रवेशद्वार-विविध दालन निर्मिती समिती, सभामंडप, रंगमंच सजावट व आसन व्यवस्था समिती, ध्वनी नियंत्रण व प्रकाश योजना समिती, उद्घाटन व समारोप समारोह समिती, शहर सुशोभीकरण समिती, भोजन व अल्पोपाहार समिती, स्वच्छता-पाणीपुरवठा व विद्युत व्यवस्था समिती, परिवहन व वाहनतळ समिती, प्रतिनिधी नोंदणी समिती, मदत कक्ष व मार्गदर्शन समिती, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती व अतिथी समिती, स्वागत व साहित्य महामंडळ समन्वय समिती, कार्यालयीन कामकाज व शासकीय परवानगी समिती, लेखा व लेखा परीक्षण समिती, विधी व शिस्तपालन, चौकशी व तक्रार निवारण समिती, सत्कार समिती, विविध नियोजन कार्यक्रम समिती, सांस्कृतिक कार्यक्रम समिती, लोककला व खुला मंच कार्यक्रम समिती, कविकट्टा समिती व गझल कट्टा समिती, बालकुमार दालन समिती, वर्धेकर दालन समिती, ग्रंथ प्रदर्शनी समिती यासह तब्बल ४१ समित्या गठित करण्यात आल्या असून प्रत्येक समितीमध्ये वर्धेकरांचा सक्रिय सहभाग आहे. समित्यांच्या वारंवार बैठका घेऊन नवनवीन कल्पना सुचवित असून त्या पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे वर्ध्यातील हे साहित्य संमेलन नक्कीच युनिक ठरणार, यात शंका नाही.