लोखंडी खांब घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला; मजुराचा मृत्यू, सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2022 02:15 PM2022-12-07T14:15:40+5:302022-12-07T14:17:04+5:30
चोपन शिवारातील अपघात
वर्धा : निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालविल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याने रस्त्याकडेला उलटला. हा अपघात चोपन शिवारात दि. ३ रोजी झाला. या अपघातात जखमी मजुराचा सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सहा मजूर जखमी झाले. याप्रकरणी ५ रोजी खरांगणा पोलिसात चालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
सूरज दशरथ सोमकुवर (वय ३०, रा. वाढोणा) असे मृतकाचे नाव आहे. तर अंकुश सुदाम भांगे, प्रवीण गोकुळ राऊत, राजू अरुण गिरडे, अरविंद सुधाकर कुबडे, शंकर वासुदेव चाफले, राहुल सुधाकर हजारे (सर्व रा. वाढोणा) हे जखमी झाल्याची माहिती खरांगणा पोलिसांनी दिली.
प्रशांत हरिदास तेलंग (रा. वाढोणा) हा त्याच्या एमएच ३२ पी ५६४१ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने ट्राॅलीत सात मजूर आणि लोखंडी खांब घेऊन जात होता. दरम्यान, चालक प्रशांतने निष्काळजी आणि हयगयीने भरधाव ट्रॅक्टर चालविल्याने ट्रॅक्टर व ट्राॅली रस्त्याकडेला उलटली. यात सातही मजूर जखमी झाले.
गावातील नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेने आर्वी येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, यापैकी सूरज सोमकुवर, अंकुश भांगे, राजू गिरडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना सूरज सोमकुवर याचा मृत्यू झाला. याप्रकरणी खरांगणा पोलिसात कागदपत्र प्राप्त झाल्यावर चालकाविरुद्ध हयगयीपणाचे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.