आसूड यात्रा सेवाग्रामातून रवाना
By admin | Published: April 12, 2017 12:23 AM2017-04-12T00:23:01+5:302017-04-12T00:23:01+5:30
सीएम ते पीएम अशी आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वातील आसूड यात्रा मंगळवारी वर्धेत दाखल झाली.
सेलूत सभा : आश्रमात दिली यात्रेच्या आयोजनाची माहिती
सेवाग्राम/घोराड : सीएम ते पीएम अशी आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वातील आसूड यात्रा मंगळवारी वर्धेत दाखल झाली. ही यात्रा सेलू मार्गे सेवाग्राम येथील बापुकूटीत दाखल झाली. येथून उर्जा घेत ही यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली. येथून पुढील प्रवासाकरिता रवाना झाली.
शेतकरी, शेतमजूर, सैनिक, दिव्यांग आणि विधवांच्या हक्कांकरिता असलेली ही यात्रा नागपूर येथून निघून दुपारी वर्धेत दाखल झाली. ही यात्रा सेवाग्राम येथील बापुकूटीत पोहोचली असता कुटीच्या वऱ्हाड्यांत बसून उपस्थितांना यात्रेची माहिती दिली. येथून ही यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचली. येथे महामानवाला अभियादन करून ही यात्रा वर्धा शहरातील मुख्य मार्गाने पुढच्या प्रवासाकरिता रवाना झाली.
तत्पूर्वी सेलू येथे यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. येथे शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपटे, प्रहारचे विदर्भ प्रमुख राजू कुबडे, यवतमाळचे प्रहार जिल्हाध्यक्ष प्रमोद कुदळे, देवेंद्र गोडबोले, प्रहारचे तालुका प्रमुख मिलिंद गोमासे यांनी मार्गदर्शन केले. शिवाय यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी २०१४ लोकसभा निवडणुकीत शेतीमालाला उत्पादन खर्च-अधिक ५० टक्के नफ्याचे आश्वासन दिले होते. यासह अनेक आश्वासनाची आठवण देण्यात आली.(वार्ताहर)