वीजबिल माफीच्या मागणीसाठी ‘आप’चे ताला ठोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 05:00 AM2020-09-11T05:00:00+5:302020-09-11T05:00:36+5:30
वीज दरवाढ तातडीने मागे घेण्यासह ३० टक्के दर कपात करण्याबाबत आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोनवेळा निवेदने सादर करून शासनाचे लक्ष वेधले. क्रांतिदिनी पालकमंत्री सुनील केदार यांना घेराव घालण्यात आला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन काळातील २०० युनिटपर्यंत वीज देयक माफी व वीज दरवाढ मागे घेऊन ३० टक्के दरकपातीचे आश्वासन पूर्ण करण्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावेत, यासाठी आम आदमी पक्षाने गुरुवारी बोरगाव (मेघे) येथील वीज महावितरण कार्यालयासमोर सकाळी १० वाजता ‘ताला ठोको’ आंदोलन करण्यात आले.
वीज दरवाढ तातडीने मागे घेण्यासह ३० टक्के दर कपात करण्याबाबत आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोनवेळा निवेदने सादर करून शासनाचे लक्ष वेधले. क्रांतिदिनी पालकमंत्री सुनील केदार यांना घेराव घालण्यात आला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले.
पावसाळी अधिवेशनात याबाबत निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली होती. परंतु सरकारसुद्धा सुशांत, रिया आणि कंगणा यांच्या विळख्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे कदाचित राज्यातील महामारी आणि त्यामुळे संकटात असलेल्या जनतेबद्दल सरकार उदासीन असल्याचे दिसून आले. त्यामुळे कदाचित राज्यातील महामारी आणि त्यामुळे संकटात असलेल्या जनतेबद्दल विचार करण्याची सुबुद्धी सरकारला मिळाली नाही असे दिसून येते. आंदोलनात निदर्शने, वीज दरवाढ माफीबाबत घोषणाबाजी, प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली.
तसेच आंदोलनादरम्यान मुख्य अभियंता यांच्याशी आपच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. आपल्या मागण्या व जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवतो असे आश्वासन अभियंत्यांच्यावतीने देण्यात आले. आंदोलन शांततमय मार्गाने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन अधीक्षक अभियंत्यांमार्फत शासनाा पाठविण्यात आले. आंदोलनात आम आदमी पक्षाचे पदाधिकारी प्रमोद भोमले, नितीन झाडे, अविनाश श्रीराव, हर्षल सहारे, तुळशीराम वाघमारे, रवी बारहाते, विजय गव्हाणे, नामदेव गुजरकर, रमेश खुरगे, मयूर राऊत, योगेश ठाकूर, रवींद्र साहू, विलास चुटे, ममता कपूर, प्रीती जांभुळकर, पूनम गुल्हाणे, अजय गुल्हाणे, अक्षय राऊत, नीलेश लाटे, शिवाजी टाले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.
अशा आहेत प्रमुख मागण्या
कोविड दरम्यानच्या मार्च ते जून या चार महिन्याचे २०० युनिट वीज बिल माफीची घोषणा करावी. वीज महावितरण कंपनीकडून १ एप्रिलपासून करण्यात आलेली वीजदरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे ३०० युनिटपर्यंत ३० टक्के स्वस्त वीज देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, राज्य सरकारचा १६ टक्के अधिकार आणि वहन कर रद्द करण्यात यावा, वीज कंपन्यांचे कॅग ऑडिट करण्यात यावे. कोविडदरम्यान भरमसाठ दिलेले वीजबिल मागे घेऊन मागील वर्षी याच कालावधीत जे देयक आले होते, त्याप्रमाणे महिनेवारीचे सुधारित जुन्याच दराप्रमाणे वीज देयक देण्याचे आदेश द्यावेत आदी मागण्या आम आदमी पक्षाने केल्या.