अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण; सहा आरोपींना ठोकल्या बेड्या, तिघांचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 04:47 PM2022-06-25T16:47:05+5:302022-06-25T16:47:28+5:30
पोलिसांनी याप्रकरणात नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी सहा आरोपींना अटक केली असून तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
देऊरवाडा (आर्वी) : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विविध ठिकाणी नेत तब्बल १० दिवस डांबून ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली होती. याप्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, तीन फरार आरोपींच्या शोधार्थ आर्वी पोलीस रवाना झाल्याची माहिती आहे.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील रहिवासी अवघ्या १५ वर्षीय पीडितेला आर्वीतील गुरुनानक धर्मशाळा परिसरातील रहिवासी संगीता कोहळे हिने तिचा मुलगा नीलेश याचा फोटो दाखवून माझ्या मुलाशी लग्न कर असे आमिष देत तिचे अपहरण केले होते. तिला तब्बल दहा दिवस विविध ठिकाणी डांबून ठेवण्यात आले होते. मात्र, पीडितेने सुटका करून आर्वी पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार पोलिसांना दिली होती. पोलिसांनी याप्रकरणात नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी सहा आरोपींना अटक केली.
संगीता सुरेश कोहळे (३८) रा. खानवाडी, शीतल सुरेश कोहळे (२०) रा. सुसनेर जि. जिल्हा अगार, मध्यप्रदेश ह. मु. खानवाडी, बाल्या उर्फ वासुदेव भाऊराव मरस्कोल्हे (४५) रा. जनतानगर, अशोक कैलास पाल (५५) रा. दहेगाव मुस्तफा, अविनाश श्याम शेंडे (२७) रा. दहेगाव मुस्तफा, वसंत शंकर डोंगरे (४७) रा. मकरधोकडा जि. नागपूर असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोस्को सेलच्या ज्योत्स्ना गिरी, गणेश खेडकर, सुरेश मेंढे करीत आहेत.