वर्ध्यातून अपहरण! लैंगिक शोषण केले; लहान मुलीची सुटका, आरोपीला बेड्या
By चैतन्य जोशी | Published: January 12, 2024 07:14 PM2024-01-12T19:14:04+5:302024-01-12T19:14:21+5:30
वर्ध्यातून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीस पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथून अटक करून मुलीला ताब्यात घेतले.
वर्धा: वर्ध्यातून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीस पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथून अटक करून मुलीला ताब्यात घेतले. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वतीने ११ रोजी करण्यात आली. वृशाल उर्फ ऋषी राजेश मानकर (२६ रा. बल्लाळ लॉन, सिंदी मेघे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, १७ वर्षीय पीडितेशी आरोपी वृशाल याने ओळख निर्माण करून जवळीक साधत प्रेमसंबंध निर्माण केले. २६ जानेवारी २०२३ रोजी तिला फूस लावून पळवून नेले. याबाबतची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात २७ जानेवारी २०२३ मध्ये पीडितेच्या घरच्यांनी दाखल केली होती. घटनेपासून आरोपी हा अल्पवयीन मुलीला घेऊन फरार होता. त्याचा शोध न लागल्याने १९ डिसेंबर २०२३ मध्ये गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे सोपविण्यात आला.
तपासात आरोपी व पीडितेचा सातत्याने शोध घेत असताना दोघेही पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे किरायाच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली. ९ जानेवारी २०२४ रोजी पुणे येथे पोलिस पथक पाठवून लोणीकंद हद्दीतील भीमा कोरेगाव, रामनगर, वढू खुर्द मद्धे परिसरात शोध घेतला असता दोघेही मिळून आले. आरोपीने पीडितेचे लैंगिक शोषण केल्याचे आढळून आल्याने त्याला अटक करीत मुलीस ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशाखाली पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, निरंजन वरभे, नितीन मेश्राम, नवनाथ मुंडे, शबाना शेख, अनुप कावळे यांनी केली.