जुलै महिन्यात वर्ध्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 02:09 PM2024-07-24T14:09:58+5:302024-07-24T14:10:35+5:30
निम्न वर्धाची तीन दारे उघडली : बुधवारीही जिल्ह्यात येलो अलर्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सद्यःस्थितीत जिल्ह्यात जुने महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून जुलै २०२४ मध्ये ४१८ मि.मी. सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे जलाशयांच्या पाणीपातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाचे सायंकाळी ६ वाजता तीन गेट उघडण्यात आले.
निम्न वर्धा प्रकल्पाची पाणीपातळी २८२.५० मीटर असून सध्या ६५.६१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे तीन गेट उघडले असून त्यातून ३० सेमीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी वर्धा नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी आर्वी तालुक्यातील खरांगणा, वर्धा तालुक्यातील वर्धा व आंजी तसेच सेलू तालुक्यातील झाडसी या चार महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. भारतीय हवामान विभागाने बुधवारी पुन्हा येलो अलर्ट दिला आहे. पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचा प्रयत्न करून नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आजचे पर्जन्यमान
तालुका मंडळ पाऊस
आर्वी ०६ ५६.०६ मि.मी.
कारंजा ०४ ४४.०७ मि.मी.
आष्टी ०४ ३४.०९ मि.मी.
वर्धा ०७ ४८.०६ मि.मी.
सेलू ०५ ६०.०७ मि.मी.
देवळी ०६ २९.०९ मि.मी.
हिंगणघाट ०८ १३.०८ मि.मी.
समुद्रपूर ०८ ३३.०१ मि.मी.
प्रकल्पांच्या पाणी पातळीत झाली वाढ...
- सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे बोर प्रकल्पात ५०.१६ टक्के जलसाठा आहे. तसेच निम्न वर्धा प्रकल्पात ६३.२० टक्के, धाम प्रकल्पाचा ८४.१६ टक्के, पोथरा प्रकल्पात १००.०२ टक्के जलसाठा असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
- पंचधारा प्रकल्पात ९४.८६ टक्के, डोंगरगाव प्रकल्पात १००.०९ टक्के जलसाठा असून यातून विसर्ग सुरू आहे. मदन प्रकल्पात ७८.५९ टक्के तर मदन उन्नई प्रकल्प १०० टक्के भरला असून विसर्ग सुरू आहे. लालनाला प्रकल्पात ५८.२८ टक्के जलसाठा असून ५ गेट उघडण्यात आली आहे. वर्धा कार नदी प्रकल्प १०० टक्के भरला असून विसर्ग सुरू आहे व सुकळी लघु प्रकल्प ५३.६३ टक्के भरलेला आहे.