पीक नुकसान पाहणीसाठी येणारी तक्रार निवारण समितीच अनुपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2015 12:26 AM2015-10-11T00:26:02+5:302015-10-11T00:26:02+5:30
येथील मोहम्मद हुसेन भुरूमिया यांच्या शेतातील सोयाबीन पिकाला फुले व शेंगा न आल्यामुळे त्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे केली.
सोयाबीनला शेंगाच आल्या नाही
रोहणा : येथील मोहम्मद हुसेन भुरूमिया यांच्या शेतातील सोयाबीन पिकाला फुले व शेंगा न आल्यामुळे त्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे केली. कृषी विभागाने मंगळवारी शेतावर प्रत्यक्ष पीक पाहणीसाठी पीडित शेतकऱ्यास लेखी कळविले, असे असतानाही कृषी विभागातर्फे कोणीच न आल्याने पीक पाहणी झाली नसल्याची बाब उघडकीस आली. यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शेतकरी मोहम्मद हुसेन भुरूमिया यांनी पुलगाव येथील कृषी केंद्रातून एका कंपनीच्या सोयाबीनच्या दोन बॅग १७ जून २०१५ रोजी खरेदी करून शेतात पेरा केला. पेरणीनंतर शेतकऱ्याने सर्व सोपस्कार केले. पिकाची वाढ देखील पर्याप्त प्रमाणात झाली. इतरांच्या शेतातील सोयाबीनला फुले व शेंगाही भरल्या; पण सदर शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनला फुलेही आली नाही. परिणामी शेतकऱ्याचे नुकसान झाले. सदर पीडित शेतकऱ्याने याबाबतची तक्रार आर्वी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे केली. ३ सप्टेंबर २०१५ ला कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केली तरी कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यानंतर पं.स.च्या कृषी विभागातर्फे जा.क्र.६४१५/पंसआ/कृषी/ गुवि/तक्रार/वशी-दि. ३०/९/१५ अन्वये सदर शेतकऱ्याला ६ आॅक्टोबरला तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पूर्व तपासणी करणार असल्याचे कळविले. यावेळी स्वत: शेतावर उपस्थित राहावे, असेही सांगितले. पत्रानुसार पीडित शेतकरी दिवसभर शेतात उपस्थित होता; पण तक्रार निवारण समितीचे कोणीही आले नाही. परिणामी शेतकऱ्याला मनस्ताप झाला. यामुळे पीक कापणी करून रब्बीच्या पिकासाठी शेत केव्हा तयार करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.(वार्ताहर)