निवडणुकीच्या कामातील शिक्षकांची मुख्याध्यापकाकडून गैरहजेरी
By admin | Published: October 28, 2015 02:21 AM2015-10-28T02:21:51+5:302015-10-28T02:21:51+5:30
नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या कामाकरिता शाळेत हजर नसलेल्या शिक्षकाची शाळेत गैरहजेरी लावण्याचा प्रकार येथील जिल्हा परिषदेच्या उबदा शाळेच्या मुख्याध्यापकाने केला.
मुख्यध्यापकावर कारवाई करा : शिक्षक संघाचे निवेदन
समुद्रपूर : नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या कामाकरिता शाळेत हजर नसलेल्या शिक्षकाची शाळेत गैरहजेरी लावण्याचा प्रकार येथील जिल्हा परिषदेच्या उबदा शाळेच्या मुख्याध्यापकाने केला. मुख्याध्यापकाच्या या नियमबाह्य कामाची शिक्षण विभागात चांगलीच चर्चा सुरू आहे.
समुद्रपूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक १ नाव्हेंबरला होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्थानिक तहसीलदार, काम पाहत आहेत. या कामाकरिता आवश्यक सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करून नियुक्ती करण्यात आली. यानुसार जि.प. उबदा शाळेतील सुनील लोडे व दिलील झाडे या दोन शिक्षकांची मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून निवडणूक पथकात अधिकाऱ्यांनी नियुक्ती केली. तसे आदेश शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेमार्फत संबंधिताला पोहचता केला.
नगरपंचायत निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण १७ आॅक्टोबरला होते. त्यासंबंधी नियुक्त शिक्षकांनी शाळेचे मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुख यांना १६ आॅक्टोबरलाच माहिती देत अवगत केले. असे असताना मुख्याध्यापक यु.जी. राठोड यांनी या दोनही शिक्षकांची हजेरीपटावर गैरहजर नोंद करून प्रकरण शिक्षणविभागाकडे प्रस्तावित केले. या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी शिक्षक संघाने निवदेनातून केली आहे.