लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2022 05:08 PM2022-07-26T17:08:37+5:302022-07-26T17:26:11+5:30
लॉजवर नेत केले शोषण
वर्धा : लग्नाचे आमिष देत एकल महिलेला नंदोरी चौकातील एका लॉजवर नेत शोषण करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना हिंगणघाट शहरात उघडकीस आली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी २५ रोजी आरोपीविरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
२४ वर्षी पीडितेच्या पतीचे निधन झाल्याने ती तिच्या मुलासह राहत होती. दरम्यान, पीडितेच्या मानलेल्या भावाचा मित्र सुरेश रामदास वैद्य (३२) याचे पीडितेच्या घरी नेहमीच येणे जाणे असल्याने त्यांच्यात ओळख निर्माण झाली. पाहता पाहता आरोपी सुरेश आणि पीडितेत प्रेमसंबंध जुळले. पीडिता ही परितक्ता असल्याने आरोपी सुरेश याने लग्नाचे आमिष देत तुझा व तुझ्या मुलाचा सांभाळ करेल, असे आश्वासन देत तिला एका लॉजवर नेत तिचे शोषण करून अत्याचार केला. मात्र, सुरेशने लग्नास नकार दिल्याने पीडितेने विचारणा केली असता जीवे मारण्याची धमकी सुरेशने दिली. अखेर पीडितेने याबाबतची तक्रार हिंगणघाट पोलिसात दिली असून, पोलिसांनी आरोपी सुरेशविरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
चार महिन्यांपूर्वी केला आरोपीने विवाह
आरोपी सुरेश वैद्य रा. हिंगणघाट याने पीडितेला लग्नाचे आमिष देत चार महिन्यांपूर्वी दुसऱ्या मुलीशी संसार थाटल्याने पीडितेची फसवणूक केली. ही बाब पीडितेला माहिती होताच पीडितेने त्याच्याशी संपर्क साधून विचारणा करण्याचा प्रयत्न केला. सुरेशने जीवे मारण्याची धमकी देत प्रतिसाद दिला नाही.
न. प. कार्यालय परिसरात केला पीडितेचा विनयभंग
२५ रोजी पीडिता ही हिंगणघाट येथील नगर परिषदेच्या कार्यालयात रहिवासी दाखला काढण्यासाठी गेली असता आरोपी सुरेश कार्यालयातील पार्किंगजवळ आला आणि पीडितेचा विनयभंग करून शिवीगाळ करू लागला. पीडितेने त्याला हटकले असता तुझ्याकडून जे होते ते कर, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.