आयुष्याचा जोडीदार म्हणून १२ दिव्यांगांचा केला स्वीकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 05:37 PM2024-07-02T17:37:15+5:302024-07-02T17:38:32+5:30
५० हजारांचे अनुदान : रोख २० हजार, २५ हजार रुपयांचे बचतपत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हिंदू धर्मात १६ संस्कारांपैकी एक विवाह संस्कार मानला जातो. सुसंस्कृत समाजात योग्य जोडीदाराच्या निवडीसाठी अनेक गोष्टी पाहिल्या जातात. गत वर्षात १२ धडधाकट व्यक्तींनी आयुष्याचा जोडीदार म्हणून दिव्यांगांचा स्वीकार केला आहे. वर्षाकाठी किमान पाच ते कमाल आठ असे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला प्राप्त झाले असून त्याच्या सुखी संसारासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
समाजातील दिव्यांग व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे, यासाठी दिव्यांग आणि दिव्यांग नसलेल्या व्यक्तींच्या विवाहास शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. शासनाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ज्या प्रकारे आर्थिक साहाय्य केले जाते, त्याचप्रमाणे दिव्यांग व अव्यंग व्यक्ती विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्याची योजना सुरू करण्यात आली.
२०१४ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. २०१६ पासून या योजनेचा प्रत्यक्ष लाभ पोहोचविण्यासाठी सुरुवात झाली. आतापर्यंत जिल्ह्यात ५७ व्यक्तींना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत दिव्यांग अव्यंग विवाहास प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. यावर्षी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांग व दिव्यांग नसलेल्या सात जोडप्यांनी अर्थसाहाय्यतेसाठी अर्ज केले.
शासनाकडून प्रति जोडपे ५० हजार रुपये याप्रमाणे गतवर्षी १२ जोडप्यांसाठी सहा लाख रुपये समाज कल्याण विभागाकडून वितरित केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीनी विवाह झाल्यानंतर किमान एका वर्षात जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयात अर्ज करणे बंधनकारक आहे.
किती मिळते अनुदान
या योजनेत लाभार्थीना रोख २० हजार देण्यात येतात. २५ हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र दिले जाते. साडेचार हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य देण्यात येते. ५०० रुपये स्वागत समारंभासाठी दिले जातात. अशा एकूण ५० हजार रुपयांची मदत देऊन या जोडप्यांचा सत्कार केला जातो. वर्ष २०२३-२४ या काळात १२ जोडप्यांना सहा लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
अनुदानाचे निकष काय
● योजनेचा लाभ घेणारे दिव्यांग वधू-वर महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.
● लाभार्थींपैकी कोणीही एक व्यक्ती ४० टक्के अथवा त्याहून अधिक दिव्यांग असावा. तसेच वर-
वधूचा हा प्रथम विवाह असावा.
● वर किंवा वधू घटस्फोटित असल्यास योजनेची यापूर्वी मदत घेतलेली नसावी.
● विवाह हा कायदेशीररीत्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविणे आवश्यक.
"या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ५७ लाभार्थीना लाभ देण्यात आला आहे. योजनेबाबात जनजागृती झाल्याने अर्ज करणाऱ्यांचे प्रमाण वाढतीवर आहे. गत वर्षात १२ जोडप्यांना योजनेतून लाभ देण्यात आला आहे. वर्षाकाठी किमान आठ ते १० अर्ज समाज कल्याण विभागाला प्राप्त होतात."
- सोनाली शिंदे, सहा, सल्लागार, समाज कल्याण जि. प. वर्धा.