स्वप्नांना आयाम देताना बापूंचा साधेपणा स्वीकारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 11:52 PM2019-06-25T23:52:35+5:302019-06-25T23:53:40+5:30
या जिल्ह्याला महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचा वारसा लाभलेला आहे. या जिल्ह्यातूनच आपण आज वैद्यकीय शिक्षणाचा आणि आरोग्यसेवेचा वसा घेतला आहे. युवापीढी ही देशाची शक्ती असून नेहमीच स्वप्नांच्या पाठीमागे धावत असते. त्या स्वप्नांना चांगल्या विचाराची जोड दिल्यानंतर होणाऱ्या स्वप्नपूर्तीतून समाज आकाराला येतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : या जिल्ह्याला महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचा वारसा लाभलेला आहे. या जिल्ह्यातूनच आपण आज वैद्यकीय शिक्षणाचा आणि आरोग्यसेवेचा वसा घेतला आहे. युवापीढी ही देशाची शक्ती असून नेहमीच स्वप्नांच्या पाठीमागे धावत असते. त्या स्वप्नांना चांगल्या विचाराची जोड दिल्यानंतर होणाऱ्या स्वप्नपूर्तीतून समाज आकाराला येतो. त्यामुळे युवकांनी या स्वप्नांना आयाम देताना बापूंचे साधेपणाने जगणे स्वीकारावे, असे आवाहन तामीळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.
सावंगी (मेघे) येथील विद्यापीठ सभागृहात आयोजित दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच विविध आयुर्विज्ञान शाखांतील एकूण ७१६ विद्यार्थ्यांनी कुलपती दत्ता मेघे यांच्याकडून आरोग्यसेवेची दीक्षा प्राप्त केली. या समारंभात कराडच्या कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांचा शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील योगदानाकरिता राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. राजीव बोरले, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे, डॉ. सतीश देवपुजारी, प्र-कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, डॉ. एस. एस. पटेल, कुलसचिव डॉ. ए. जे. अंजनकर, वैद्यकीय शाखेचे अधिष्ठाता डॉ. अभय मुडे, डॉ. ललित वाघमारे, दंतविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. सुधींद्र बालिगा, आयुर्वेद शाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, परिचर्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. सीमा सिंग, रवी मेघे, डॉ. डी. के. अग्रवाल, डॉ. गौरव मिश्रा, डॉ. आलोक घोष, डॉ. मीनल चौधरी, डॉ. सुनीता वाघ, डॉ. तृप्ती डेहने, डॉ. के. के. सिंग, डॉ. प्रीती देसाई, डॉ. वैशाली ताकसांडे, डॉ. प्रज्ञा निखाडे, डॉ. एम. इर्शाद, डॉ. सुनीता श्रीवास्तव, डॉ. आदर्शलता सिंग, ब्रजेश लोहिया यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन डॉ. तृप्ती वाघमारे, डॉ. नाजनीन काझी, डॉ. समर शुक्ल यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.
अक्षदा शर्मा आठ सुवर्णपदकांची मानकरी
या दहाव्या दीक्षांत समारोहात वैद्यकीय शाखेतील अक्षदा शर्मा ही विद्यार्थिनी सर्वाधिक पुरस्कारांची मानकरी ठरली. तिला आठ सुवर्ण पदके व तीन रोख पुरस्कार प्राप्त झाले. यासोबतच, श्यामोलिमा भुयान हिला पाच सुवर्ण पदके व एक रोख पुरस्कार, शरण्या राय हिला तीन सुवर्ण पदके व एक रोख पुरस्कार, सुषमा एस. हिला दोन सुवर्ण व दोन रजत पदके, प्रियाल मुंधडा हिला दोन सुवर्ण पदक प्राप्त झाले. स्नातकोत्तर अभ्यासक्रमातील एम.डी. मेडिसिनचे डॉ. अमित डफळे यांना ७ सुवर्ण पदके तर एम.डी. सर्जरीचे डॉ. विवेक सिन्हा यांनी चार सुवर्ण पदके प्राप्त केली. आयुर्वेद अभ्यासक्रमात रोझिना शेख रझा ही सर्वाधिक पुरस्कारांची मानकरी ठरली असून तिला ३ सुवर्ण, एक रजत पदक व तीन रोख पुरस्कार प्राप्त झाले. तर दंतवैद्यकशास्त्राची विद्यार्थिनी मेघा अग्रवाल ही तीन सुवर्ण पदकांची मानकरी ठरली.
सुवर्णपदाकासह रोख पुरस्काराने गौरव
समारोहात वैद्यकीय शाखेतील ३४२ व दंतविज्ञान शाखेतील १५९ (पीएचडी, एमडी, एमएस, स्नातकोत्तर, स्नातक), आयुर्वेद शाखेतील ७१ , परिचर्या विज्ञान शाखेतील १३७ तर परावैद्यकीय शाखेतील ७ विद्यार्थ्यांसह एकूण ७१६ विद्यार्थी कुलपतींकडून आरोग्यसेवेची दीक्षा घेतील. यावेळी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना एकूण ८६ सुवर्ण पदके व ७ रौप्य पदकांसह १३ चान्सलर अवॉर्ड आणि रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात ३५ विद्यार्थ्यांना फेलोशीप तर वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, परावैद्यकीय आणि परिचर्या शाखेतील एकूण ७४ विद्यार्थ्यांना पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. तर १३ विद्यार्थ्यांना यावेळी आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले.