विद्यार्थ्यांच्या मेटॅडोअरला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:50 PM2018-01-11T23:50:08+5:302018-01-11T23:50:33+5:30
येथील यशवंत महाविद्यालयाचे विद्यार्थी केळझर येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरासाठी मेटाडोअरमध्ये मंडप व स्वयंपाकाचे साहित्य घेवून जात होते. दरम्यान, विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने समोरासमोर त्या मेटाडोअरला धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : येथील यशवंत महाविद्यालयाचे विद्यार्थी केळझर येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरासाठी मेटाडोअरमध्ये मंडप व स्वयंपाकाचे साहित्य घेवून जात होते. दरम्यान, विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने समोरासमोर त्या मेटाडोअरला धडक दिली. यात विशाल केदार वानखेडे (२२) या बीए भाग २ मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर या वाहनात असलेले अन्य तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या अपघातात विद्यार्थ्यांसह ट्रकचा चालक व क्लिनरही गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरूवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास वर्धा-नागपूर महामार्गावर कोंटबा थांब्याजवळ घडला.
यशवंत महाविद्यालयाचे रासेयो शिबिर केळझर येथे आयोजित करण्यात आले होते. शुक्रवारी उद्घाटनाचा कार्यक्रम असल्याने गुरूवारी मंडप व स्वयंपाकाचे साहित्य मेटाडोअर घेवून एमएच ३२ क्यू १८३२ क्रमांकाच्या मिनिडोअरमध्ये ७ ते ८ विद्यार्थी बसून जात होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने लोहागिट्टी भरून आलेल्या एमएच ४० एके ३०१३ क्रमांकाच्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात मेटाडोअरमधील शुभम झाडे (रेहकी), स्वप्नील भांगे (बोरी), सागर हलगे सालई (पेवठा) हे विद्यार्थी गंभीर जखमी झाले. यातील सागर हलगे हा महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे. मेटाडोअर चालक वैभव उमाटे अपघातानंतर पळून गेला. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
शिबिराकरिता ३९ विद्यार्थ्यांची झाली होती निवड
रासेयो शिबिरासाठी २८ विद्यार्थिनी व ११ विद्यार्थी वेगवेगळ्या आॅटोतून जात होते. यातीलच ७ ते ८ विद्यार्थी मेटाडोअरमध्ये सामानासह बसून जात होते. या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मातीकाम सुरू असलेल्या भागात जाऊन ट्रक पलटला. या ट्रकला लटकून अपघातग्रस्त मेटाडोअरमधील एक विद्यार्थी फरफटत गेल्याचे उपस्थितांनी सांगितले.
सुमोला कारची धडक; चार जखमी
वर्धा - अमरावती येथील विशाल शंकर रंगारी (२६) हे एमएच २७ एसी ८९६५ क्रमांकाच्या सुमो गाडीत प्रवासी घेऊन पुलगाव येथे आले होते. पंचधारा मार्गावर त्यांच्या गाडीला विरुद्ध दिशेने आलेल्या एमएच ३५ पी ०७५१ क्रमांकाच्या कारने धडक दिली. या अपघातात सुमोत असलेल्या प्रवाशांसह कारमधील प्रवासी व चालक असे चौघे जखमी झाले आहे. विशाल रंगारीच्या तक्रारीवरुन कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.