दोन जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 08:21 PM2022-03-10T20:21:07+5:302022-03-10T20:21:37+5:30
Wardha News केळझर येथील दोन जिवलग मित्र दुचाकीने नागपूरवरून परत येत असताना आसोला (सावंगी) (जि. नागपूर) गावाजवळ भीषण अपघात झाला. अपघातात दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला.
वर्धा : केळझर येथील दोन जिवलग मित्र दुचाकीने नागपूरवरून परत येत असताना आसोला (सावंगी) (जि. नागपूर) गावाजवळ भीषण अपघात झाला. अपघातात दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ९ मार्चला मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास झाला. गुरुवारी दोघांच्याही पार्थिवावर एकाचवेळी केळझर येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जगदीश सुनील साखरकर (२८), जयंत केशव मुजबैल (२६) असे मृत युवकांची नावे आहे. जगदीश साखरकर यांचा ट्रान्सपाेर्टचा व्यवसाय आहे. वाहनांचे काही सुटे भाग आणण्यासाठी बुधवारी दुपारच्या सुमारास नागोसे नामक मित्राची एमएच-३२/एआर-८८५० क्रमांकाच्या दुचाकीने जयंत मुजबैले या मित्राला सोबत घेत जगदीश नागपूरला गेला होता. काम आटोपून गावाकडे परतीच्या प्रवासात उशिरा रात्री नागपूर जिल्ह्यातील आसोला (सावंगी) गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दोन्ही जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती केळझर गावात पसरताच गावात शोकाकुल वातावरण होते.
मृतक जगदीश साखरकर याच्या पश्चात आई आहे. तो एकमेव आधार होता; तर जयंत मुजबैले हा देखील एकुलता एक होता. त्याला दोन विवाहित बहिणी आहेत. दुपारी एकाचवेळी दोघांचीही अंत्ययात्रा गावातून काढण्यात आली. अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सहभागी झाला होता.
‘त्या’ घटनेचा उजाळा अन् डोळे पाणावले
अपघातात एकाच वेळी दोन युवकांचा जीव जाण्याची ही दुसरी घटना आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी केळझर गावातील काही तरुण दुचाकीने महाशिवरात्रीला पचमढी येथे महादेवाच्या दर्शनाला गेले होते. एका दुचाकीचा अपघात झाला होता त्यात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला होता. पुन्हा तशीच घटना घडल्याने पाणावलेल्या डोळ्यांनी त्या घटनेची आठवण झाल्याची चर्चा गावकऱ्यांकडून ऐकावयास मिळाली.