कॅशलेस एटीएममुळे खातेदार त्रस्त
By admin | Published: June 13, 2017 01:11 AM2017-06-13T01:11:00+5:302017-06-13T01:11:00+5:30
नोटाबंदीच्या निर्णयानंतर बहुतांश एटीएम कॅशलेस झाले. त्यामुळे रोकड असलेल्या एटीएमचा शोध घेण्यासाठी विविध बँकांच्या खातेदारांना सध्या शहराचा फेरफटका मारावा लागत आहे.
एटीएमवर नागरिकांच्या रांगा कायम : रोख उपलब्ध करुन देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नोटाबंदीच्या निर्णयानंतर बहुतांश एटीएम कॅशलेस झाले. त्यामुळे रोकड असलेल्या एटीएमचा शोध घेण्यासाठी विविध बँकांच्या खातेदारांना सध्या शहराचा फेरफटका मारावा लागत आहे. ज्या एटीएममध्ये रोकड आहे त्या एटीएम समोर रोकड काढणाऱ्यांची लांबच लांब रांग लागत आहे. जवळपास सात महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रभावी कार्यवाही करण्यात येत नसल्याने रोकड काढण्यासाठी रांगेत उभे राहणारे नागरिक बँक अधिकाऱ्यांच्या नावाने बोट मोडताना दिसतात. नागरिकांची समस्या लक्षात घेता तात्काळ योग्य कार्यवाहीची गरज आहे.
गत वर्षी नोव्हेंबर महिन्यात ५०० व १००० च्या जुन्या नोट बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. सदर निर्णयानंतर दुसऱ्यादिवशी संपूर्ण एटीएम बंद होते. परिणामी, बँकांमध्येही नागरिकांची गर्दी वाढली होती. सध्या ही परिस्थिती नसली तरी शहरातील बहुतांश एटीएम कॅशलेस असल्याचे चित्र बघावयास मिळते. ज्या एटीएममध्ये ५०० व १०० रुपयांच्या नोटा आहेत त्या एटीएमसमोर दिवसाला व रात्रीला नागरिकांची लांबच लांब लागत आहे. शहरातील मुख्य बाजापेठेतील बहुतांश एटीएम मध्ये रोकड नसल्याने नागरिकांना रोकड असलेल्या एटीएमचा शोध घेण्यासाठी संपूर्ण शहराचीच वारी करावी लागत आहे.
त्यातच नागरिकांना तास-तास भर रांगेत उभे राहावे लागत असल्याने संतप्त नागरिकांसह विविध बँकांचे खातेदार बँक अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाच्या नावाने बोट मोडत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. विविध बँकांच्या एटीएमध्ये रोकडच नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.