‘त्या’ आरोपीला केली बिहार राज्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:25 PM2018-08-03T22:25:13+5:302018-08-03T22:25:51+5:30
आरंभा येथील समीर देवतळे याची तेथीलच दोघांनी चाकूने मारहाण करून हत्या केली. या प्रकरणातील आरोपी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला समुद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी दुसरा आरोपी घटनेच्या दिवशीचीच पसार झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : आरंभा येथील समीर देवतळे याची तेथीलच दोघांनी चाकूने मारहाण करून हत्या केली. या प्रकरणातील आरोपी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला समुद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी दुसरा आरोपी घटनेच्या दिवशीचीच पसार झाला होता. त्या आरोपीला समुद्रपूर पोलिसांनी बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातून अटक केली आहे. जॉकी भोसले (२०), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करून त्याची सोमवार ६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळविल्याचे पोलिसांनी सांगितले.
समीर देवतळे याला जुन्या वादाचा काढण्यासाठी आरंभा येथील दोघांनी चाकूने मारहाण केली. यात समीर गतप्राण झाला. सदर प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होताच जॉकी गावसोडून पसार झाला. दरम्यान समुद्रपूर पोलिसांनी घटनेतील आरोपी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्या घेवून न्यायालयाच्या आदेशान्वये त्याची बालसुधार गृहात रवानगी केली. गुन्हा दाखल झाल्यापासून समीर देवतळे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या जॉकीचा शोध घेत होते. समुद्रपूर पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातील विविध गावांसह शेजारच्या नागपूर जिल्ह्यात जॉकीचा शोध घेतला; पण तो समुद्रपूर पोलिसांना गवसत नव्हता. दरम्यान खात्रिदायक माहितीच्या आधारे समुद्रपूर पोलिसांच्या चमुने बिहार राज्यातील भागलपूर येथे ठाण मांडून जॉकीला अटक केली. ज्या भागातून जॉकीला अटक करण्यात आली तेथून नेपाळची सीमा जवळ आहे. त्याने नातेवाईकाकडे आश्रय घेतला होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेळे, ठाणेदार प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मिलींद पारडकर, यशवंत गोल्हर, रवी वर्मा, सचिन रोकडे, स्वप्नील वाटकर, अशोक चहांदे, राजु जैयसिंगपूरे, अमोल खाडे, अजय घुसे, वीरेंद्र कांबळे यांनी केली.
पारधी बेडे काढले पिंजून
समुद्रपूर पोलिसांनी वर्धा, नागपूर जिल्ह्यातील अनेक पारधी बेडे जॉकी भोसलेच्या शोधार्थ पिंजुन काढले होते; पण तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्यानंतर आरोपी हा बिहार राज्यात असल्याची माहिती मिळल्याने पोलीस उपनिरीक्षक मिलींद पारडकर यांच्या चमूने तेथे जाऊन त्याला मोठ्या शिताफीने अटक केली.
१,२०० झोपड्यांमध्ये घेतला शोध
सदर पथकाने भागलपूर शहर, खदरा, तितरी, शाहुक पर्वता, फत्तेपुर या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण आरोपी चतुरच होता. तो आपले ठिकाण वारंवार बदलवित होता. दरम्यान आरोपी तितरी गावात लपून असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथील सुमारे १ हजार २०० झोपड्यांमध्ये त्याचा शोध घेत त्याला अटक केली.